मोखाड्यात आरोग्य सेवेसाठी पायलट प्रोजेक्ट राबवणार! -डॉ. दीपक सावंत

0
1905

ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला वेग

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 13 : मागील काही दिवसात तालुक्यातील ढासळत्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तांची दखल घेत माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि. 11) मोखाडा तालुक्याला प्रत्यक्ष भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी डॉ. सावंत यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचून अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे गार्‍हाणे घातल्याने यावर डॉ. सावंत यांनी व्यक्तीशः लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

तालुक्यातील आरोग्य सेवेतील मोठी समस्या असलेल्या डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत बोलताना डॉ. सांवत म्हणाले की, कठीण व नक्षली भागात काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना मुळ वेतनाच्या 30 टक्के अतिरिक्त वेतन देण्याच्या पूनर्विलोकन समितीच्या शिफारशी असताना आदिवासी बहुल भागात अधिकारी-कर्मचारी काम करण्यास नकार देतात. त्यामुळे त्यांनी अशा ठिकाणी जाऊन व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे काम करावे, यासाठी पूनर्विलोकन समितीच्या धर्तीवर एक पायलट प्रोजेक्ट (पथदर्शी प्रकल्प) राबविण्याची विनंती राज्यसरकारकडे करणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला खुद्द खोडाळा परिसरातील महसुली गाव-पाड्यांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांतील रुग्णांचा देखील मोठ्या प्रमाणावर ओघ असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची जोरकस मागणी यावेळी ग्रामस्थांनी नोंदवली असता याबाबत तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर आरोग्य पथके, रेस्क्यू कँप, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आणि ऑनकॉल येणारे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर अशा तब्बल 39 डॉक्टरांचा ताफा आरोग्य सेवेच्या तैनातीत असतानाही मोखाडा तालुक्यातून आरोग्य सेवेबाबत तक्रारी येणे ही बाब गंभीर असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करतानाच वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन सरप्राइज स्पॉट विझीट करण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

या दौर्‍यादरम्यान डॉ. सावंत यांच्या सोबत शिवसेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, खोडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभाकर पाटील, उपसरपंच मनोज कदम, प्रविण काळे, राहूल कदम तसेच जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वाडा तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय बोरकुल्ले, मोखाडा तालुका वैद्यकीय अधिकारी किशोर देसले आदी उपस्थित होते.