वसई, दि. 12 जुलै : वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वसई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
डॉ. पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे ते खंदे समर्थक होते. वसई विरार महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर अनेक डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकडे पाठ फिरवली होती. अशा वेळी स्वतःला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास असताना डॉ. हेमंत पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत शहरातील डॉक्टरांचे मनोबल वाढवून कोरोनाशी लढा देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पुढाकारानंतर वसई विरार महापालिका क्षेत्रातील अनेक डॉक्टर प्रेरित झाले होऊन कोरोनाशी मुकाबला करण्यास सरसावले.
डॉ. पाटील वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी स्वेच्छेने सांभाळत होते. वसई विरार महापालिकेने त्यांच्या पुढाकारातून कौल सिटी व अग्रवाल कोव्हीड सेंटर उभारले होते. कोरोनाग्रस्तांना सेवा देत असताना, ह्या योद्ध्याला कोरोना संसर्ग झाला. गेल्या 10 दिवसांपासून ते अत्यवस्थ होते, हितेंद्र ठाकूर यांनी हेमंत पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, अद्ययावत उपचारपद्धती उपलब्ध करुन दिल्या. मात्र दुर्दैवाने त्यात यश आले नाही.