
डहाणू, दि. २९ : महिलांच्या मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनेटरी नॅपकिन समाजातील तळागाळातील गोरगरीब महिलाना चांगल्या प्रतीचे आणि माफक दरात उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त वडोदरास्थित वात्सल्य फाउंडेशनतर्फे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण संस्थेला सॅनेटरी नॅपकिन तयार करण्याचे युनिट देणगी म्हणून देण्यात आले. ૨૮ मे रोजी डॉ. वसुधा कामत, डॉ प्रितम पाठारे यांच्या हस्ते या युनिटचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अलका मांडके, डॉ अनघा आमटे, श्री शाम बेडेकर, स्वाती बेडेकर, सुप्रसिद्ध दूरदर्शन व सिनेतारका विशाखा सुभेदार, तसेच नुतन बाल शिक्षण संघाच्या उपाध्यक्षा सौ. संंध्या करंदीकर, सचिव दिनेश पाटील, विश्वस्त महेश कारीया, चंद्रेश जोशी, विनायक बारी, प्रभाकर सावे, सुधीर कामत ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाम बेडेकर यांनी सॅनेटरी नॅपकिन तयार करण्याची सर्व प्रक्रिया प्रात्यक्षिकांसह उपस्थितांना दाखविली. तसेच वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याबाबतही माहिती दिली. कल्पना चावला यांनी मासिक पाळीतील महीलांच्या वेदना विशद करणारे गुजराती गाणे सादर केले आणि वात्सल्य फाउंडेशनची माहिती दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ पाठारे, वसुधा कामत, अलका मांडके, विशाखा सुभेदार यांनी समाजातील प्रत्येकाकडून दुर्लक्षिलेला व घृणास्पद वाटणार्या महिलांच्या मासिक पाळी व त्यावरील उपाय या गंभीर प्रश्नावर वात्सल्य फाउंडेशन करत असलेल्या कामाबाबत कौतुक केले आणि आपणही यापुढे सर्व सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली. सिनेतारका विशाखा सुभेदार यांनी संस्थेचे सदस्य होण्याची तयारी दर्शविली. सौ. संध्या करंदीकर यांनी नूतन बाल शिक्षण संघाच्या कार्याची सविस्तर माहिती दिली आणि हे युनिट बालवाडी, अंगणवाडी सेविकांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. तर स्वाती बेडेकर यांनी संस्थेला दिलेल्या देणगी बद्दल वात्सल्य फाउंडेशनचे व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
पॅडवूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वाती बेडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महीलांना रोजगार, आर्थिक पाठबळ आणि माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वात्सल्य फाउंडेशनच्या माध्यमातूनच कामाला सुरुवात केली. तसेच आजचे हे १०६ वे युनीट असल्याचे त्यांनी सांगितले. ૨૮ मे हा दिवस मागिल ૪ वर्षापासून आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा होतो आणि प्रत्येक वर्षी या दिवशी आम्ही नविन युनीट सुरू करतो असे बेडेकर म्हणाल्या. शेवटी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तिंचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. श्री व सौ. मेहता, डॉ. सौ. पुनावाला, सौ. शुभांगी करंदीकर तसेच इतर अनेक महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान वात्सल्य फाउंडेशन तर्फे अंगणवाडी आणि बालवाडी सेविकांना सॅनेटरी नॅपकिन तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.