डहाणू आदिवासी प्रकल्पातील निरीक्षकास 2 हजाराची लाच घेताना अटक!

0
1928

कुकुटपालनाची रक्कम अदा करण्यासाठी केली होती लाचेची मागणी

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : कुकुट पालन व्यवसायाकरिता आदिवासी लाभार्थाला मंजूर झालेली अनुदानाची रक्कम त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागणार्‍या डहाणू एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील लाचखोर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. यशवंत पुरुषोत्तम खानोरे (वय 55) असे सदर लाचखोर निरिक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार लाभार्थ्याला आदिवासी प्रकल्पातुन कुकुटपालन व्यवसायासाठी 16 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. मात्र अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात वर्ग करण्यासाठी डहाणू आदिवासी प्रकल्पाचे निरीक्षक यशवंत खानोरे यांनी त्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे याबाबत सदर लाभार्थ्याने 6 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाने काल, 16 सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करुन आज, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता डहाणू प्रकल्प कार्यालयात सापळा रचून निरीक्षक खानोरे याला 2 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली.

सापळा अधिकारी उप अधीक्षक के. एस. हेगाजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुतार, पालवे, सुवारे, चव्हाण, पोलीस शिपाई सुमडा, मांजरेकर व दौडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, खानोरे याच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.