वार्ताहर
बोईसर, दि. 16 : येथील कुरगाव ग्रामपंचायतीने 29 वर्षांपुर्वी बाजारपेठेसाठी बांधलेले गाळे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात आल्याची बाब शिवसेनेचे पालघर पंचायत समिती सदस्य सुशील चुरी यांनी पालघर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मांडत अशा प्रकारे सरकारी जागेवर अतिक्रमण करणार्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुरगाव येथील सर्व्हे नं. 169 मधील जागेत ग्रामपंचायतीने 1989 साली बाजारपेठेसाठी गाळ्यांचे बांधकाम केले होते. यात एकुण 11 गाळ्यांचा समावेश असुन या गाळ्यांच्या बाजूलाच गावाकरिता अंगणवाडी बांधण्यात आली आहे. मात्र गेल्या सप्टेंबर महिन्यात सदर गाळे अनधिकृत असल्याची बाब पंचायत समिती सदस्य चुरी यांनी पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मांडल्यानंतर गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी याबाबत सुनावणी घेऊन सदर जागा ही महसूल विभागाची असल्याचे खातरजमा करून तसेच या गाळ्यांच्या बांधकामासाठी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम त्वरीत जमिनदोस्त करुन सरकारी जागेवर अतिक्रमण करणार्या तत्कालीन ग्रामपंचायत सरपंचासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी चुरी यांनी केली आहे. तसेच या गाळ्यांचा उपयोग गोरगरीबांसाठी करण्याऐवजी आपल्या नातेवाईकांना त्याचा फायदा पोहचविण्याचा प्रयत्न संबंधितांनी केल्याचा गंभीर आरोपही चुरी यांनी केला आहे.
जिल्हा परिषदने दिलेल्या अंदाजपत्रकानुसार तसेच ग्रामसभेच्या मंजुरीने रीतसर लिलाव व भाडेतत्त्वावर ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सदर गाळे बांधण्यात आले आहेत. तसेच ही जागा महसूल विभागाची असुन सन 1984 सालापासून ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
– मयूर पाटील, ग्रामसेवक, कुरगाव
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!
