वसई, दि. 4 : तालुक्यातील नालासोपारा शहरात बेकायदेशीररित्या व शासनाने कोरोनाशी लढण्यासाठी जारी केलेले नियम व आदेश पायदळी तुडवून सुरु असलेल्या दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई करुन दोन्ही दुकानाच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. किसन धर्मेद्र सिंग (वय 21) व राम अकबाल यादव (वय 24) अशी सदर आरोपींची नावे आहेत.
नालासोपारा पूर्वेतील अचोळे रोडवरील भरत शॉपिंग सेंटरच्या पहिल्या माळ्यावरील शॉप नं. 5 व 6 या गाळ्यांमध्ये व सनशाईन सर्कल येथील घन्सार प्लाझा इमारतीतील किंग्ज कॅफे येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची गुप्त माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणांवर छापे मारले असता शासनाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागु केलेले नियम व आदेश धुडकावून येथे हुक्का पार्लर सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी अचोळे रोड येथील हुक्का पार्लरमधुन 13 हजार 700 रुपयांचा व सनशाईन सर्कल येथील हुक्का पार्लरमधुन 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन्ही दुकानांच्या मालकांना ताब्यात घेतले आहे.
दोन्ही आरोपींवर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188,270,285 सह सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणीज्य व्यवहार उत्पादन पुरवाठा व वितरण याचे विनियमन) अधिनियम 2003 चा सुधारीत अधिनियम 2018 चे कलम 4 व 21 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास चालु आहे.