>आदिवासी भागासाठी ही रक्तपेढी जीवनदान -दीपक सावंत
जव्हार, दि. 14 : येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयातील रक्तपेढी व साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज, शुक्रवारी राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत व आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने येथे वैद्यकीय दंत व महारक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.
जव्हार तालुका हा ग्रामीण आदिवासी भाग असल्याने येथील रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी नेहमीच अडचण यायची. विशेष करून प्रसूतीदरम्यान मातांना रक्ताची नेहमीच गरज भासत असल्यामुळे येथील रुग्णांच्या कुटूंबियांना नाशिक, ठाणे किंवा पालघर शहर गाठून रक्त आणावे लागत असे. मात्र आता पतंगशहा कुटीर रुग्णालयात रक्तपेढी सुरु करण्यात आल्याने येथील आदिवासी रुग्णांची रक्ताची दगदग कायमची सुटणार असुन आदिवासी ग्रामीण भागासाठी ही रक्तपेढी जीवनदान ठरणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले. पतंगशहा कुटीर रुग्णालयाला 200 खाटांची मंजुरी दिली असून त्यामुळे रुग्णांची अडचण दूर होणार आहे. तसेच येथील सोई-सुविधांसाठी आम्ही कधीच निधी कमी पडू देणार नाही असे सांगतानाच रुग्णांच्या तपासणीसाठी लवकरच येथे डायलेसिस सेंटर सुरु करणार असल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.
साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुनाट व गळक्या इमारतीमुळे या परिसरातील रुग्णांना पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने सुसज्ज अशी नवीन इमारत बांधून दिल्याने रुगणांची होणारी हेळसांड थांबणार आहे.

यावेळी मोखाड्याचे सभापती प्रदीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, माजी नगराध्यक्ष दिनेश भट्ट, आदिवासी आघाडी अध्यक्ष हरीचंद्र भोये, श्रावण खरपडे, प्रल्हाद कदम, आरोग्य विभाग प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक डॉ. अनुपकुमार यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी व जव्हारचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड तसेच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, अशोक भोये, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. गौरी राठोड, सहायक संचालक डॉ. अरुण थोरात, नगरसेवक कुणाल उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दरम्यान, यानिमित्ताने जे. जे. हॉस्पिटलमधील डॉ. भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 तज्ञ डॉक्टरांमार्फत 1054 बाह्यरुग्णींची तपासणी करण्यात आली. यापैकी 85 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!