तलासरीत 24 हजारांची अवैध दारु पकडली

0
2979

तलासरी, दि. 17 : 31 डिसेंबर रोजी साजर्‍या होणार्‍या नववर्षाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्याच्या शेजारील केंद्रशासित प्रदेशातून विदेशी दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. यावर आळा बसावा म्हणून पालघर जिल्हा पोलीस सतर्क असुन अशाप्रकारे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन अवैधरित्या दारुची वाहतूक करणार्‍या 28 वर्षीय तरुणावर तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून 23 हजार 600 रुपयांची विविध प्रकारची दारु जप्त करण्यात आली आहे.

15 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. योगेश दिलीप काळे (वय 28, रा.वाणगांव-पाटीलपाडा) हा तरुण आपल्या वाहनातून अवैधरित्या शेजारील राज्यातून आणलेली दारु वाहतूक करुन नेत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी गावच्या हद्दीत पोलिसांना त्याला अडवले. यावेळी त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्यात 11,424 रुपये किंमतीचे किंगफिशर कंपनीचे 168 टिन, 9,360 रुपये किंमतीच्या इम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या 144 बाटल्या, 2,904 रुपये किंमतीच्या इम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या 12 मोठ्या बाटल्या, असा एकुण 23 हजार 688 रुपये किंमतीचा दारु साठा आढळून आला.

पोलिसांनी सदर साठा जप्त करत योगेश काळेवर तलासरी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.