बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचे कामबंद आंदोलन
वैदेही वाढाण/बोईसर, दि. 02 : तारापूर एमआयडीसीमधील कापड बनवणार्या कारखान्यांमध्ये प्रसिध्द असलेल्या बॉम्बे रेयॉन या कारखान्यातील कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासुन वेतन न मिळाल्याने हतलब झालेल्या या कामगारांनी आज कारखान्यामध्ये कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे रखडलेल्या पगारासाठी पुकारलेले या वर्षातले हे तिसरे आंदोलन असून कारखानदार मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
बॉम्बे रेयॉन कारखान्यात सुमारे साडेचार हजार कामगार काम करतात. यात महिला कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर तयार कपड्याचे उत्पादन घेतले जाते. यासाठी कामगारांना 8-8 तास राबवून घेतले जाते मात्र पगार देताना कंपनीतर्फे अनेक कारणे सांगून तब्बल 3-3 महिने पगार रखडवला जात असल्याचे येथील कामगार सांगतात. अशाप्रकारेच गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे कामगारांनी आज, सोमवारी कारखान्याच्या गेटला आतून कडी लावून कारखान्याच्या आवारातच ठिय्या मांडला. तसेच व्यवस्थापनाच्या एकाही कर्मचार्यास कारखान्यात येऊ न देता काम बंद आंदोलन केले. गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे व तिन्ही वेळा तीन-तीन महिने कारखानदाराने वेतन राखडवल्याने कामगारांनी ही आंदोलने केली होती. मात्र कारखाना प्रशासन दरवेळी खोटी आश्वासने देत पगार देण्यास टाळाटाळ करत असल्याचे कामगारांनी सांगितले.
मालाला उठाव नसणे, जागतिक मंदी अशा कारणांमुळे पगार देण्यास उशीर होतो, असे कारखाना व्यवस्थापनेचे म्हणणे आहे. मात्र व्यवस्थापन व मालक खोटारडे असून दरवेळी खोटं बोलून, गोड बोलून काम करवून घेतात तसेच महिला कामगारांना आठवड्याची सुट्टीही नाही, मूलभूत सुविधा नाहीत अशा अनेक तक्रारी महिला कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर केल्या आहेत.