प्रतिनिधी
मोखाडा, दि. 11 : तालुक्यातील नाशेरा येथील गुरूनाथ मोहन भागडे (21), विमल गुरूनाथ भागडे (18) व रवी बच्चू भागडे (20) हे तिघे शेतावरून घराकडे परतत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. परंतू गुरूनाथचा लहानगा भाऊ जयेश याच्या सजगतेमूळे या तिघांचेही प्राण वाचवणे शक्य झाले आहे.
या बाबत गुरूनाथ व त्याचे वडील मोहन भागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूनाथ सह त्याची पत्नी विमल, लहान भाऊ जयेश व चुलत भाऊ रवी असे चौघे शेतीच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी काम आटोपुन घरी परतत असतांना नाशेरा नदीला उतार असल्याचे पाहून गुरूनाथने भाऊ जयेश याला गावाकडील बाजूस पैलतीरावर नेऊन सोडले व पुन्हा पत्नी व चुलत भाऊ यांना घेण्यासाठी गेला. यावेळी पत्नीला घेऊन मध्यावर परतत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे जवळ-जवळ 1 किमी प्रवाहात वाहुन गेल्याचे पाहून रवी त्यांना वाचवण्यासाठी धावला परंतू तोही वाहून जात असल्याचे पाहून जयेशने गांवाच्या दिशेने आरोळ्या मारीत धुम ठोकल्याने तीघांचेही प्राण वाचवने शक्य झाले असल्याचे मोहन भागडे यांनी गदगदत्या स्वरात सांगितले. दरम्यान, तिघांवर खोडाळा येथील डॉ. कडव यांच्या खाजगी दवाखान्यांत उपचार सुरू आहेत.