- 10 ते 12 गावांचा मतदानावर बहिष्कार
- शिवसेना उमेदवाराला बसणार फटका

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : वाढवण बंदर उभारणीच्या निषेधार्थ डहाणू किनारपट्टीवरील गावांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर कायम राहत सुमारे 10 ते 12 गावातील नागरीकांनी आज मतदानाकडे पाठ फिरवल्याने येथील उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे बहिष्कार टाकण्यात आलेल्या गावांमध्ये भाजप-शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात मतदार असल्याने त्याचा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघात मोडणार्या वाढवण येथे समुद्रकिनारी भूमिपुत्र व स्थानिक ग्रामस्थांचा विरोध डावलून शासनाने वाढवण बंदर उभारण्याचा घाट घातला आहे. प्रस्तावित बंदरामुळे या भागातील पारंपारिक व्यवसाय नष्ट होऊन पर्यावरणाचा देखील र्हास होणार आहे. या भीतीतून येथील नागरीकांनी बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदालने केली आहेत. मात्र त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसत असल्याने अखेर वरोर, डहाणूखाडी, गुंगवाडा, धूमकेत, चंडीगाव, बहाड, पोखरण, ताडीयाले यांसारख्या गावांनी आज मतदानावर बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदवला. दुपारपर्यंत या गावांमधील मतदान केंद्रांवर 0 टक्के मतदान दिसून आले. सगळीकडील मतदार आपापल्या कामांमध्ये गुंतले होते. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसुन येत होता.
या बहिष्कामुळे मात्र पालघर मतदार संघातून निवडणूक लढणार्या उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली असून हा संपुर्ण भाग शिवसेना व भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. येथील जवळपास 10 ते 15 हजार मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याने सेनेच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बहिष्काच्या पार्श्वभुमीवर मतदान केंद्रांवर स्थानिक पोलिंग एजंट देखील नेमले नसल्याने निवडणूक कामासाठी येथे आलेले निवडणूक कर्मचारी आराम करताना दिसले.