डहाणू दि. 1 सप्टेंबर: डहाणू तालुक्यातील आशागड ग्रामपंचायतीच्या 8 सदस्यांनी ग्रामसेवक मनोज इंगळेच्या मनमानीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. ग्रामसेवक इंगळेकडून न झालेले ठराव मासिक सभेमध्ये व ग्रामसभेमध्ये घुसडणे, पैसे घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचा भूखंड बिल्डरच्या घशात घालणे अशा अनेक नियमबाह्य कृत्यांमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याच्या भावनेने हे राजीनामे दिल्याचे समजते आहे.
20 ऑगस्ट रोजी आशागड ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. ह्या सभेमध्ये प्रकाश बच्चू धोडी, संतोष लक्ष्मण बोंड, कृष्णा लक्ष्मण गुरोडा, श्रीमती मना गणपत मेरे, सौ. रुक्सार अब्दुल खान, सौ. प्रतिभा अनिल गुप्ता, श्रीमती वैशाली अनिल माळी व विजय गोपाळ दुबळा अशा 8 सदस्यांनी आपला सामूहिक राजीनामा सरपंचांपुढे सादर केला. सरपंच सौ. मालती दौडा यांनी तसा ठराव (क्र. 8) मंजूर करुन सर्वांचे राजीनामे मंजूर केल्याचे जाहीर केले आहे व ग्रामसेवक मनोज इंगळे यांनी लगेचच 21 ऑगस्ट 2020 रोजी राजीनाम्यांबाबत गटविकास अधिकारी यांना (जावक क्र. 89/2020) कळवले आहे.
11 पैकी 8 सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे आशागड ग्रामपंचायत बरखास्त होण्याचे संकेत मिळत असून त्यानंतर प्रशासक म्हणून कोणाची नेमणूक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आशागड ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ग्रामसेवक इंगळेच्या गैरप्रकारांची जंत्री मांडल्याचे समोर आले आहे.