देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन – प्रशांत भूषण

0
2601

PRASHANT BHUSHAN

शिरीष कोकीळ/राजतंत्र न्यूज नेटवर्क      

डहाणू, दि. ८: देशातील न्याय व्यवस्था सशक्त करण्याबाबत मोदी सरकार उदासीन असून सध्याच्या न्याय व्यवस्थेत सामान्य माणूसास न्याय मिळणे अवघड असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते डहाणूतील सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या स्वयंसेवी संस्थेच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी निवृत्त सनदी पोलीस अधिकारी डॉ. के. एस. सुब्रमण्यम, संस्थेचे अध्यक्ष संतोष शेट्टी, उपाध्यक्ष नरेंद्र पटेल उपस्थित होते.

 न्यायालयातील कार्यप्रणाली सोपी केल्यास सामान्य व्यक्ती वकीला शिवाय न्याय मागू शकेल. योग्य न्यायाधीशांची निवड, न्यायाधीशांची संख्या वाढविणे, न्यायालयातील कार्यप्रणाली सोपी करणे इत्यादी बाबींवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे आग्रही मत देखील भूषण यांनी मांडले. डॉ. के. एस. सुब्रमण्यम यांनी पोलीस खात्यातील चुकीच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र सुधारणा होणे आवश्यक असले तरी राजकारण्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे त्यात म्हणावे तसे यश मिळत नसल्याची खंत यावेळी बोलताना मांडली. छत्तीसगढचे दिनेश सोनी यांनी ग्राम न्यायालया विषयी, मालती सुब्रमण्यम यांनी महिलांची सुरक्षा व त्यासाठीच्या  कायदेशीर उपाय योजना याबाबत सविस्तर विवेचन केले. सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या संघटानांच्या शिखर संस्थेचे अध्यक्ष भगवानजी रैयाणी यांनी राष्ट्र पातळीवर संस्थेतर्फे चालू असलेल्या कार्याची माहिती दिली.

यानिमित्ताने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष योगदान देणाऱ्या श्रीमती गोवेर मुबारकाई, अवयवदानाचा पुरस्कार करणारे श्री व सौ जयराम घाटाल, चित्रकलेमध्ये विशेष प्रावीण्य दाखवणाऱ्या कु. संजना रीशा मंडल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष शेट्टी यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची सुत्रे नरेंद्र पटेल यांच्याकडे सोपविल्यानंतर पटेल यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली.