डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे अत्यवस्थ स्थितीत आढळले – उपचारासाठी मुंबईत हलविले

0
7260

डहाणू दि. 26: डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे आज त्यांच्या निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात अत्यवस्थ स्थितीत आढळले. त्यांच्यावर तातडीने डहाणूतील वेस्टकोर्स रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

पिंपळे यांची पत्नी बाहेरगावी गेल्यामुळे ते घरी एकटेच होते. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास डहाणू नगरपरिषदेचा कर्मचारी त्यांच्याकडे गेला असता आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजाऱ्यांकडे असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यांच्या डोक्याला इजा झाली होती व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. नजिक रहाणारे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा हे देखील लगेच पिंपळेंच्या निवासस्थानी पोहोचले. पिंपळेंना वेस्टकोर्स रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, उप नगराध्यक्ष रोहिंग्टन झाईवाला, यांसह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन पिंपळेंच्या प्रकृतीची चौकशी केली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना आता पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले.

पिंपळे मध्यरात्री उठले असता रक्तदाब कमी झाल्याने कोसळून जखमी झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते 2 दिवस कार्यालयात आले नव्हते.