पालघर जिल्ह्यात तिसर्‍या टप्प्यातील करोना लसीकरण सुरु; जेष्ठ नागरीक व दुर्धर आजारग्रस्तांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जेष्ठ नागरीक व दुर्धर आजारग्रस्तांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

0
2626

पालघर, दि. 1 : जिल्ह्यामध्ये आज, 1 मार्चपासुन करोना (कोविड -19) लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व 45 ते 59 वर्ष वयोगटातील दुर्धर आजारग्रस्तांना लसीकरण करण्यात येणार असुन संबंधितांनी को-विन अ‍ॅप किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात आरोग्य सेवक व फ्रंटलाईन वर्कर्सना करोना लस देण्यात आल्यानंतर आज एक मार्चपासुन लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यानुसार 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरीक व 45 ते 59 वर्ष वयोगटातील ज्यांना काही दुर्धर आजार आहेत (आणि जे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाद्वारे प्रमाणित आहेत) अशांना लस दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यासाठी नोंदणी करावी लागणार असुन को-विन (COWIN) अ‍ॅप, आरोग्य सेतु (AAROGYA SETU) अ‍ॅप किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करुन या माध्यमांवर आपले खाते तयार करावे लागणार आहे. खाते तयार करण्यासाठी वर नमुद अ‍ॅप किंवा संकेतस्थळावर आपला मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी समाविष्ट केल्यानंतर आपले नाव, वय, लिंग आणि ओळख दस्तऐवज अपलोड करावे लागेल. जे लोक 45-59 या वयोगटातील दुर्धर आजारग्रस्त असतील त्यांना कॉमोरबिडिटी प्रूफ म्हणून डॉक्टरांचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागले. यानंतर त्यांना लसीकरण केंद्र व तारीख निवडता येईल. एका मोबाइल नंबरद्वारे 4 लोकांची नोंदणी करता येणार आहे.

दरम्यान, ज्या ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाची माहिती नाही अशा जेष्ठ नागरिकांनी जवळच्या कोविड-19 लसीकरण केंद्रावर जावे. किंवा अधिक माहितीसाठी 1507 या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू उपजिल्हा रुग्णालय, कासा उपजिल्हा रुग्णालय, जव्हार उपजिल्हा रुग्णालय, पालघर ग्रामीण रुग्णालय (जे.जे. हेल्थ युनिट), तलासरी ग्रामीण रुग्णालय, मोखाडा ग्रामीण रुग्णालय, वाडा ग्रामीण रुग्णालय, विरार ग्रामीण रुग्णालय, मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र व वसई-विरार महानगर पालिका हद्दीतील वरुन इंडस्ट्रीज येथे लसीकरण सत्र सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.

त्याचबरोबर खाजगी रुग्णालय जे प्रधाममंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत आहेत. अशा ठिकाणी जेष्ठ नागरीक व दुर्धर आजारग्रस्तांना प्रति डोस 250 रुपये देऊन लस घेता येईल. वसईतील जनसेवा हॉस्पिटल, नालासोपार्‍यातील विजयालक्ष्मी हॉस्पिटल, मनोरमधील आस्था हॉस्पिटल व बोईसरमधील साईनित हॉस्पिटल या चार रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना लसीकरणाचे सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन आज देण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये पुढील दोन दिवसात लसीकरण सत्र सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.