वाडा : विहिरीवर कपडे धुवायला गेलेल्या दोघींचा बुडून मृत्यू!

मृतांमध्ये 28 वर्षीय महिला व 8 वर्षीय मुलीचा समावेश!

0
1864
संग्रहित छायाचित्र

वाडा, दि. 31 : विहिरीवर कपडे धुवायला गेलेल्या एका महिलेचा व मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. निना विष्णू वाघ (वय 28) व रानी राजेश वाघ (वय 8) अशी त्यांची नावे असुन पाय घसरुन या दोघी विहिरीत पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निना वाघ व रानी वाघ या दोघी काल, रविवारी संध्याकाळी घरापासुन काही अंतरावर असलेल्या विहिरीवर कपडे धुवायला गेल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न परतल्याने कुटूंबियांनी त्यांचा शोध घेतला असता विहिरीजवळच त्यांनी धुण्यासाठी नेलेले कपडे आढळून आले. तर दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. स्थानिकांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवले.

दरम्यान, या दोघी पाय घसरुन विहिरीत पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.