करोना : जिल्ह्यात आठवडाभरात तिपटीने वाढला दैनंदिन रुग्णांचा आकडा; आज 1,188 नव्या रुग्णांची नोंद

0
2280

पालघर, दि. 7 : राज्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याच्या सरकारच्या आदेशाला राज्यासह पालघर जिल्ह्यातील व्यापार्‍यांकडून कडाडून विरोध होत असताना, दुसरीकडे मात्र जिल्ह्यात करोना रुग्णांचा दैनंदिन वाढत जाणारा आकडा परिस्थिती गंभीर होत असल्याचा इशारा देत आहे. आज संपुर्ण जिल्ह्यात तब्बल 1 हजार 188 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असुन 1 एप्रिलची आकडेवारी पाहिल्यास हा आकडा तिपटीने वाढला असल्याचे दिसुन येत आहे. 1 एप्रिल रोजी जिल्ह्यात दैनंदिन 374 रुग्ण आढळून आले होते.

जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी जिल्ह्यात 1 हजार 188 रुग्ण आढळून आले असुन यात केवळ वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 807 रुग्णांचा समावेश आहे. तर पालघर तालुक्यात 196 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पालघर पाठोपाठ दुर्गम आदिवासी तालुका समजल्या जाणार्‍या जव्हारचा समावेश असुन येथे 115 जणांना करोनाची लागण झाली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारी पाहिल्यास डहाणूत 24, मोखाड्यात 22, वाड्यात 13, तलासरीत 6 व विक्रमकड तालुक्यात 5 रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात करोना लागण झालेल्या एकुण रुग्णांची संख्या आता 54 हजार 813 वर पोहोचली असुन यातील 47 हजार 849 जणांनी करोनावर मात केली आहे. तर सध्यस्थितीत 5 हजार 717 अ‍ॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मागील आठवडाभरात करोना लागण झालेल्या 19 जणांचा मृत्यू झाला आहे.