रेल्वे अधिकार्‍यांची डहाणूतील चिकू बागायतदार व व्यापार्‍यांशी चर्चा

चिकू वाहतूक समस्येबाबत झाली सखोल चर्चा

0
2016

डहाणू, दि. 14 : देशातील शेतकर्‍यांच्या उत्पादीत शेतमालाला किफायतशीर वाहतूक सुुुविधा उपलब्ध करून देेेण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अभय सानप व मिश्रा यांची नुकतीच डहाणू येथे चिकू उत्पादक शेेेतकर्‍यांशी महत्वाची बैैैठक झाली. यावेळी चिकू वाहतूक समस्येबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

सध्या तालुक्यातील बहुतांश चिकू ट्रकने दिल्ली येथील बाजारपेठेत पाठवला जातो. यामध्ये वाहतुकीला लागणारा वेळ आणि खर्च यामुळे येथील शेतकरी व व्यापारी मेटाकुटीस आले असल्याची माहिती महाराष्ट्र चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी बैठकीत दिली. यावेळी चिकु फळाची दिल्ली आदर्शनगर येथे रेल्वे मार्फत वाहतुक कशी जलद, सुरक्षित, कमी वाहतुक भाडे आकारुन व कायमस्वरूपी सुरू राहील या संदर्भात उपस्थित चिकू बागायतदार व व्यावसायिकांची रेल्वे अधिकार्‍यांशी सखोल चर्चा झाली. या बैठकीदरम्यान, उपस्थित बागायतदार व व्यावसायिकांनी रेल्वेमार्फत चिकू वाहतुक करण्याची ग्वाही दिली. तर रेल्वे अधिकार्‍यांनी याबाबत सकारात्मकता दाखवून लवकरात लवकर अशी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगितले.

बैठकीस डहाणू रेल्वे स्थानक व्यवस्थापक राकेश शर्मा, महाराष्ट्र राज्य चिकु उत्पादक संघाचे सचिव मिलींद बाफना, खजिनदार यग्नेश सावे, शेतकरी चंद्रकांत पाटील, युवा शेतकरी यशीत सावे, चेतन धारणे, बेरुस ईरानी तसेच चिकु व्यापारी राजेश ठाकुर, होरमेज ईराणी, लक्षु कुंदनानी आणि डहाणु तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव हितेंद्र पाटील उपस्थित होते .