
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 19 : महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या पालघर युवक अध्यक्षपदी कॅप्टन सत्यम ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच घरोघरी जाऊन महाविकास आघाडी सरकारच्या योजनांचा लाभ पोहचविणार असल्याचे सांगतानाच युवकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांनी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सत्यजित तांबे तसेच कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

सत्यम ठाकूर हे अमेरिकेत पायलट म्हणून पाच वर्ष काम करत होते. भारतात परतल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली. युवक काँग्रेसच्ूया माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम ते करत आहेत. आदिवासी भागातील नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळाव्या तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची पालघर युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात काँग्रेस संघटन बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे.