>>जागेच्या वादामुळे रखडले काम
>>जुन्या इमारतीतील अपुर्या जागेमुळे रुग्णांचे हाल

वैदेही वाढाण/बोईसर, दि. 29 : काही वर्षांपुर्वी शासनाने बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर केलेल्या जागेवर भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) व तारापूर अणुऊर्जा केंद्राने (एनपीसीआयएल) आपला ताबा सांगत आडकाठी निर्माण केल्यामुळे बोईसरमधील गरीब व कामगार वर्गाला आणखी काही काळ नवीन ग्रामीण रुग्णालय इमारतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
बोईसर शहर आज लोकसंख्येच्या बाबतीत लाखोंच्या घरात पोहोचले आहे. मागील अनेक वर्षांपासुन येथील नवापुर नाका भागात जागेअभावी भाडे तत्वावर 14 खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. मात्र या रुग्णालयात दररोज तीनशेहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने तसेच दर महिन्याला 30 च्या वर महिलांची प्रसूती होत असल्याने जागेअभावी येथे रुग्णांना दाखल करणे देखील कठीण होत आहे. परिणामी गरीब रुग्णांना अधिक पैसे खर्च करुन खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. तसेच येथे उपचारासाठी येणार्या रुग्णांना व त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा परिषदेकडून दांडी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र हे आरोग्य केंद्र बोईसर शहरापासुन 14 किलोमीटर दूर असल्याने बोईसर व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना त्याचा लाभ होत नाही. बोईसर शहर मध्यवर्ती ठिकाण असल्याने विविध भागातील रुग्ण बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी पाहायला मिळते.
रुग्णांची ही गरज लक्षात घेता शासनातर्फे काही वर्षांपुर्वी चित्रालय जवळील व अगदी बीएआरसी वसाहतीच्या सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या सर्व्हे नं. 107 अ/30 या चार एकर जमिनीवर 30 ते 50 खाटांच्या नवीन ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी जागा मंजूर करण्यात आली. तसेच या जागेवर राजकीय पुढार्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील केला. मात्र बीएआरसीने या जागेवर आपला ताबा असल्याचे सांगत इमारतीचे काम सुरु करण्यास विरोध केला. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सदर जमीन वनखात्याची असल्याचे उघड झाले व इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर इमारतीसाठी आवश्यक त्या परवानग्या घेऊन पालघर जिल्हाधिकार्यांनी जिल्हा चिकित्सक यांच्या नावे सातबारा करून जमिनीवर साफसफाईचे काम सुरु करण्यात आले. मात्र पुन्हा बीएआरसीच्या सुरक्षा अधिकार्यांनी जागेची साफसफाई करणार्या कामगारांना काम करण्यास विरोध करुन काम बंद पाडले.

दरम्यान, याबाबत बीएआरसीचे अधिकारी आर. जे. पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता याप्रश्नी आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.
चित्रालय येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय आदिवासी व गोरगरीब रुग्णांकरिता सोयीचे ठरणार असुन ही जागा वनखात्याकडून ग्रामीण रुग्णालयाच्या नावी केली गेली आहे. त्यामुळे या जागेवर कोणीही काम करण्यास मज्जाव करू नये.
–राजेंद्र केळकर, जिल्हा चिकित्सक, पालघरगणेश नाईक वनमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव मंजूर झाला होता. आता ग्रामपंचायतीमार्फत हे ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता प्रयत्न करत आहोत. मात्र बीएआरसी व एनपीसीआयएल गोरगरिबांसाठी ग्राम्रीण रुग्णालय उभारण्यात मदत करण्याऐवजी विरोध करत असल्याचा खेद वाटत आहे.
-संजय पाटील, अध्यक्ष, शिवशक्ती सामाजिक संघटना
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!