… तर, जिल्ह्यातील मंगल कार्यालये व रिसॉर्ट मालकांवर होणार कारवाई

सामुदायिक विवाह सोहळ्यांवरही बंदी; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0
2015

पालघर, दि. 24 : राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासन व स्थानिक प्रशासनांनी आपआपल्या क्षेत्रात करोना नियमांचे सक्तीने पालन होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यातही मागील काही दिवसांपासुन करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालघर जिल्हाधिकार्‍यांनी आता सामुदायिक विवाह सोहळ्यांवर बंदी घातली आहे. तसेच इतर विवाह सोहळ्यांमध्ये 50 हून अधिक लोकांची संख्या आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, जनसमुदाय मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने राज्यामध्ये तसेच पालघर जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर बंदी घालणे आवश्यक असुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियमन 2005 नुसार पालघर जिल्ह्यात (वसई-विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून) सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यास पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 7), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, शासनाने घालून दिलेल्या करोना नियमांनुसार, विवाह सोहळ्यांमध्ये 50 हून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदारांसह पालघर तालुक्यातील काही लग्न सोहळ्यांची अचानक पाहणी केली असता 500 च्या आसपास लोक आढळून आले. त्यामुळे मंगल कार्यालये किंवा रिसॉर्टमध्ये आयोजित विवाह सोहळ्यांमध्ये 50 हून अधिक लोक आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालये व रिसार्ट मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.