पालघर, दि. 25 : 10 लाखांच्या खंडणीसाठी चेन्नई येथून अपहरण केलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे या 30 वर्षीय नौसैनिकाची अज्ञात अपहरणकर्त्यांनी डहाणूतील घोलवड भागातील जंगलात जिवंत जाळून हत्या केल्याची घटना 5 फेबु्रवारी उघडकीस आली होती. आधीच साधु हत्याकांडामुळे कुप्रसिद्ध झालेल्या पालघर जिल्ह्यातील ही दुसरी घटना पुन्हा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. घटनेचे गांभिर्य पाहता पालघर जिल्हा पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. सुरजकुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीत त्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दुबे यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्जही घेतले होते. या कर्जाच्या बोजापाई त्यांनी स्वतः हा खंडणीचा बनाव रचला असल्याचे व स्वत:ला जाळून घेतल्याचे आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
सुरजकुमार दुबे इंडीयन नेव्हीमध्ये लिडींग सी मॅन या पदावर कार्यरत होते. 5 फेबु्रवारी 2021 रोजी घोलवडमधील वेवजी-वैजलपाडा येथील स्थानिकांना दुबे जळालेल्या अवस्थेत दिसले होते. यानंतर त्यांच्यावर डहाणूतील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार करुन पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूपुर्वी दुबे यांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता. जबाबात म्हटल्या प्रमाणे, 30 जानेवारी 2021 रोजी सुट्टी संपवून ते रांची येथुन विमानाने रात्री 9 वाजता चेन्नई विमानतळावर पोहचले. विमानतळाच्या बाहेर आल्यावर 3 अज्ञात इसमांनी रिवॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. यानंतर त्यांना सफेद रंगाच्या एसयुव्ही गाडीमध्ये बसवून चेन्नईतच अज्ञात स्थळी 3 दिवस डांबून ठेवले. अपहरणकर्त्यांनी सुटकेसाठी 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र आपण खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी आपल्याला जिंवत पेटवून दिले, असे दुबे म्हणाले होते.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पालघर पोलीस दलाची 10 पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी चेन्नई विमानतळ परिसर, दुबेंचे कामावरील सहकारी व नातेवाईकांकडे याबाबत सखोल चौकशी केली. तसेच चेन्नई विमानतळ परिसर व तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज खंगाळल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या.
पोलिसांच्या तपासातील सविस्तर मुद्दे खालीलप्रमाणे :
- 1) दुबे हे दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.17 ते 10.50 वाजेपर्यंत चेन्नई विमानतळाच्या बाहेरील हॉटेल सर्वेशमध्ये जेवण करतात. नंतर कोयबेंडू बसस्टॅन्ड परिसरात मुक्तपणे फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
- 2) दुबे यांचे 10 लाख रूपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे हि बाब त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितली नाही. तसेच अपहरणकर्त्यांनी देखील खंडणीसाठी त्यांच्या नातेवाईकांना फोन केलेला नाही. यावरून दुबेंचे खंडणीसाठी अपहरण केले आहे, असे म्हणने संयुक्तिक वाटत नाही.
- 3) दुबे हे 31 जानेवारी 2021 पासुन 1 फेबु्रवारी 2021 रोजी संध्याकाळी 4.18 पर्यंत चेन्नई व वेल्लूर येथील पॉप्युलर लॉजमध्ये वास्तव्यास होते. दरम्यानच्या काळात ते कोयबेंडू एसटी स्टॅन्ड, अरिहंत टॉवर या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये मुक्तपणे फिरत होते. त्यानंतर ते 12.50 वाजता टी.एन.23/एन. 2494 या क्रमांकाच्या धर्मापुरकडे जाणार्या बसमध्ये बसुन वेल्लुर येथे पोहचुन तेथील पॉप्युलर लॉजमध्ये चेक इन केले. यानंतर 1 फेबु्रवारी 2021 रोजी संध्याकाळी 06.38 वाजता चेक आऊट करून लॉजच्या बाहेर पायी चालत जात असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. याबाबत हॉटेलचे मालक व वेटर यांना विचारपुस केली आहे. यावरून दुबे यांना चेन्नई येथे 3 दिवस डांबुन ठेवले होते, असे म्हणणे संयुक्तीक नाही.
- 4) दुबे यांच्या 9334495376 या मोबाईल क्रमांकावर चंदन कुमार दुबे यांनी 1 फेबु्रवारी 2021 रोजी संध्याकाळी 5.58 ला कॉल केला होता. त्यावेळी दुबे यांनी स्वत:ची ओळख न दाखविता ’इरफान-इरफान’ बोलुन फोन कट केला. मात्र तो आवाज सुरजकुमार दुबेंचाच असल्याचे चंदन कुमार यांनी ओळखले आहे. नंतर दुबेंनी फोन बंद केला होता.
- 5) 5 फेबु्रवारी 2021 रोजी सदर घटना घडल्यांनतर दुबे यांनी डहाणुतील सिव्हील रुग्णालयात दाखल असताना दिलल्या जबाबात देखील इरफान हेच नाव सांगितले. यावरुन त्यांनी अपहरणाचा बनाव कसा रचायचा हे पुर्वीपासुनच ठरविले होते असे दिसुन येते.
- 6) दुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना चेन्नई येथुन रात्री गाडीत बसवले व सकाळी 9 वाजता वेवजी घोलवड येथे घटनास्थळी आणले आहे. परंतु चेन्नई ते वेवजी वैजलपाडा (घोलवड) हे अंतर सुमारे 1480 किलोमिटर आहे. हे अंतर कापण्यास सुमारे 25 ते 26 तासापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये तथ्य
दिसुन येत नाही. - 7) घटनास्थळ हे वेवजी वैजलपाडा येथे असुन घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वेवजी व झाई कोस्टल चेकपोस्ट आहेत. त्या ठिकाणी 24 तास नाकाबंदी कार्यान्वीत असुन तेथे सीसीटीव्ही कॅमरे लावलेले आहेत. झाई अथवा वेवजी कोस्टल चेकपोस्टवरून एसयुव्ही प्रकारचे वाहन गेल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे दुबे काहीतरी खोटी व दिशाभुल करणारी माहिती सांगत असल्याचे स्पष्ट होते. तरी दुबे हे घटनास्थळी कसे आले अथवा त्यांना कुणी आणले आहे का याबाबत तपास करण्यात येत आहे.
- 8) घटनास्थळी जाण्याचा मार्ग अडथळ्याचा व अडचणीचा आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी एकटा मनुष्य डोळे उघडे ठेवुन कोणत्याही सहार्याशिवाय किंवा मदतीशिवाय पोहचणे अशक्य आहे. त्यामुळे दुबे यांच्या डोळ्याला पट्टी बांधुन जबरदस्ती डोंगरावर घेऊन जाणे कदापी शक्य होणार नाही. कारण सदर डोंगरावर जाण्यासाठी असलेल्या मार्गावर
दगड धांडे पडलेले असुन तो मार्ग अतिशय अरुंद पायवाटेचा, चढउताराचा व अडथळ्यांचा आहे. त्यामुळे दुबे यांना डोंगरावर जबरदस्ती डोळे, हात व तोंड बांधुन घेऊन गेले आहे या बाबीस स्पृष्टी मिळत नाहीत. शिवाय वैद्यकिय अधिकार्यांनी दिलेल्या अभिप्रायामध्ये दुबेंच्या शरिरावर अंतर्गत अथवा बाह्य भागावर मारहाणीच्या जखमा दिसुन आलेल्या नाहीत. - 9) दुबे हे वेल्लुर येथे पॉप्युलर लॉजमध्ये रहायला होते. तेथुन काही अंतरावर साऊथ वेल्लुर पोलीस ठाणे आहे. त्यांच्यावर जर का कोणाचा दबाव असता तर ते लॉजसमोर असलेल्या पोलीस ठाण्याची मदत घेऊ शकत होते. तसेच त्यांचा चुलत भाऊ चंदनसिंगने जेव्हा त्यांना कॉल केला होता, त्यावेळी देखील त्यांनी ते कोणाच्या दबावाखाली आहे, याबाबत माहिती दिली नव्हती. यावरुन त्यांना बाहेरुन कोणत्याही व्यक्तीने दबाव किंवा जबरदस्ती केली नसल्याचे दिसुन येते.
- 10) दुबे हे कोईम्बतुरमधील नेव्हल बेस येथुन 30 दिवसांच्या रजेवरून गावी आले होते. परंतु त्यांनी वडिलांना केवळ 20 दिवसाच्या सुट्टीवर आल्याचे सांगितले व त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी पुन्हा 10 दिवसाची रजा वाढविल्याचे सांगितले. यावरुन त्यांनी रजेची माहिती वडिलांपासुन लपविली होती.
- 11) दुबेंनी गावी सुट्टीवर असताना 23 जानेवारी 2021 रोजी नवीन 9334495376 या क्रमांकाचा नवीन मोबाईल क्रमांक घेतला होता. तो नंबर त्यांनी घरी किंवा मित्रांना कोणालाही न देता त्या मोबाईल नंबरची माहिती लपवुन ठेवली.
- 12) तसेच पॉप्युलर लॉज बुक करताना हॉटेलच्या रजिस्टरमध्ये स्वहस्ताक्षरात स्वतःचे नाव व पत्याची नोंद घेतली आहे. मात्र यावेळी त्यांनी त्यांचे आयडी कार्ड न देता स्वत:चे अस्तित्व लपविलेले होते.
- 13) दुबे सतत शेअर मार्केटमधील एन्जल ब्रोकींग या कंपनीला मेसेज व कॉल करीत होते. ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याच्या आहारी गेले होते. त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला होता.
- 14) त्यांना 1 फेबु्रवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता कर्तव्यावर हजर होणे आवश्यक होते. परंतु ते हजर न होता 30 जानेवारी 2001 ते 1 फेबु्रवारी 2021 रोजी संध्याकाळी 6.36 वाजेपर्यंत वेल्लुर शहरात स्वत:चे अस्तित्व लपवुन फिरत असल्याचे दिसुन आले आहे.
- 15) त्यांना जानेवारी 2021 या महिन्याचा पगार रुपये 33 हजार 838 रूपये जमा झाल्याचे दिसुन येते. त्यांनी मे 2019 ते मे 2020 या कालावधीत एसबीआय बँकेकडुन 8.43 लाख रूपयांचे वैयक्तीक कर्ज घेतले होते. त्यापैकी 2 लाख 21 हजार 310 रूपये परतफेड केली असुन सध्या 6 लाख 21 हजार 690 रकमेचे कर्ज फेडने बाकी होते व आहे. तसेच दुबे यांनी त्यांचा सहकारी धमेंद्रसिंगकडुन 2 लाख रुपये गावी घर बांधण्याचे कारण सांगुन उसणे घेतले होते. मात्र ते पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतविले होते. त्यामध्ये त्यांचा तोटा झाल्याचे दिसुन येते.
- 16) सदरचे पैसे सुरजकुमार दुबे यांनी धरमेद्रसिंगला अद्याप परत केले नसल्याने धमेंद्रसींग याने पैसे परत मागण्यासाठी तगाता लावला होता. त्याला दुबेंनी सुट्टीवरून परत आल्यावर 1 तारखेला पैसे परत देतो असे सांगितले होते. यावरून सुरजकुमार दुबेंना धमेंद्रसिंग यांचे पैसे परत करण्याचा तणाव होता असे दिसुन येते. त्याचप्रमाणे दुबे यांनी धमेंद्रसिंगचे डि-मॅट अकाउंट सुरु केले व त्याचा युजर आयडी व पासवर्ड स्वत:कडे ठेवुन शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग केले. त्यामध्ये त्यांना 3.75 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ते पैसे देखील त्यांचे देणे लागत होते.
- 17) दुबे यांचे 15 जानेवारी 2021 रोजी लग्न ठरले होते व 22 मे 2021 रोजी लग्नाची तारीख ठरविण्यात आली होती. त्यांचे होणारे सासरे ब्रिजेश तिवारी यांनी त्यांना 9 लाख रुपये दिले होते. त्यापैकी सुमारे 4 लाख रुपये त्यांनी कुटूंबियांना दिले होते. तर 5 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते. हे संपुर्ण पैसे त्यांचे बुडाले होते.
- 18) दुबे यांनी एप्रिल 2020 ते 1 फेबु्रवारी 2021 दरम्यान शेअर मार्केटमध्ये ऐंजल ब्रोकिंक कंपनीच्या माध्यमातून एकुण 17 लाख 72 हजार 900 एवढी रक्कम गुंतवली. त्यापैकी 4 लाख 67 हजार 109 एवढी रक्कम त्यांना परत मिळाली. तर उर्वरीत रक्कमेचा तोटा झाला. अद्यापही 76 हजार रुपये एवढी रक्कम ऐंजल कंपनीना देणे लागते. 30 मे 2020 रोजी दुबे यांनी आस्था ट्रेडींग कंपनीमध्ये 30 हजार रूपयांची गुंतवणूक केली असुन त्यामध्ये दि.31.1.2021 रोजी त्यांना 24 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे.
- 19) सीबीलकडे केलेल्या चौकशीत सुरजकुमार दुबेंनी अनेक बँक व आर्थिक कंपन्यांकडे मोठ्या रक्कमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
- 20) घटनास्थळ परिसरातील तलासरी एन अॅन्ड सन्स येथील पेट्रोल पंपावरील प्राप्त केलेल्या सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता दि.5.2.2021 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास दुबेंसारखा दिसणार्या इसमाने दोन प्लास्टीकच्या बॉटलमध्ये डिझल खरेदी केल्याचे दिसुन येते. याबाबत पेट्रोल पंपावरील कर्मचार्यास विचारपूस करून त्याला दुबेंचा फोटो दाखवला असता त्याने दुबेंच्या वर्णनासारख्या दिसणार्या इसमाला 3 लिटर डिझल दिल्याचे सांगितले आहे. सदरचा इसम सुरजकुमारच आहेत का, याबाबतही तपास करण्यात येत आहे.
- 21) सुरजकुमार मिथीलेश दुबे यांनी घेतलेले कर्ज, उसनवारी व शेअर मार्कटमधील गुंतवणुकीत झालेल्या नुकसानीमुळे ते सुमारे 29 ते 30 लाख रुपयांच्या आर्थिक ओझ्याखाली व तणावाखाली होते. हि बाब त्यांनी त्यांचे आई, वडील, भाऊ, बहीण तसेच मित्रांपासुनही लपवुन ठेवली. त्यामुळे याच कारणांवरुन सुरजकुमार यांनी वैफल्यग्रस्त व नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे का? किंवा खरच त्यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केली या अशा दोन्ही दिशेने पोलीस तपास करीत आहेत.