पालघर, दि. 18 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यात सुरवात झाली असून प्रशासनाकडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी आपले पूर्ण योगदान देणार आहे. जिल्ह्यातील वाढता मृत्युदर घटवण्यासाठी ही योजना नक्कीच महत्वाची ठरेलं, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आज, शुक्रवारी माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच इतर विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माध्यमांनी हा उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनंती वजा आवाहन जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी यावेळी उपस्थित प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात ‘ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ मोहीमेचा मोठा वाटा असेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोविड-१९ चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे आदी बाबी या मोहिमेत राबविल्या जाणार आहेत. माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही मोहीम वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबतचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
माझे कुटुंब – माझी जबाबदारी मोहीम जिल्हयातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायी मध्ये राबविली जाईल. या मोहिमेंतर्गत सर्व शहरे, गावे, वाडी, पाडे इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. जेणेकरून रुग्ण समोर येण्यास व मृत्यूदर घटण्यास निश्चित मदत होईल, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी उपस्थित पत्रकारांनी जिल्ह्यातील कोविड सेंटर, तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच कोविड रुग्णांकडून विविध तपासणी साठी बेकायदेशीर रित्या आकारले जाणारे शुल्क ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. तर याबाबत महिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
या पत्रकार परिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेंरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी,तहसीलदार चंद्रसेन पवार, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील व जिल्हयातील वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.