महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी? बोईसरमध्ये विजेचा धक्का लागून 1 ठार, 1 गंभीर जखमी

0
2597

बोईसर, दि. 11 : बोईसरमधील भय्यापाडा, आझादनगर भागात अचानक तुटून पडलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीच्या संपर्कात आल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रथमदर्शनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे दिसत असुन यामुळे एका तरुणाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भय्यापाडा-आझादनगर परिसरातील एका विद्युत खांबाला काल, 10 डिसेंबर रोजी सकाळी एका बोअरवेलच्या ट्रकची धडक बसली. त्यामुळे खांबावरील उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून पडली. महावितरणला हा प्रकार कळाल्यानंतर महावितरणने बोअरवेल ट्रकवर 25 हजारांच्या दंडाची कारवाई केली व त्यानंतर तुटलेली विद्युत वाहिनी जोडून विद्युत प्रवाह सुरु केला. मात्र रात्री 8 ते 8.30 च्या सुमारास अचानक सदर विद्यूत वाहिनी तुटून पडली. दुदैवाने रोहित विश्वकर्मा (22) व मोहम्मद शरीफ असे दोघे जण या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आले. यावेळी दोघांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने रोहितचा जागीच मृत्यू झाला. तर मोहम्मद शरीफ गंभीर जखमी झाला. मोहम्मदला प्रथम येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो जास्त प्रमाणावर भाजल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिकांनी महावितरण विरोधात प्रदर्शन करत संबंधितांवर कारवाईची मागणी केल्याने काही काळ तणावपुर्व वातावरण निर्माण झाले होते.