वाणगावमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश! करणी काढण्यासाठी मागितलं होतं तरुणीचं काळीज

0
2430

डहाणू, दि. 06
करणी काढण्याच्या नावाखाली किराणा दुकान मालकाकडून 5 लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या 3 भोंदूबाबांना वाणगाव पोलीसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे करणी काढण्यासाठी या भोंदूबाबांनी तरुणीचं काळीज मागितल्यानेे दुकानदारास संशय आल्याने या भोंदूबाबांचा पर्दाफाश झाला. देवनाथ मदारी, विजयनाथ मदारी आणि प्रभूनाथ मदारी अशी या भोंदूबाबांची नावे आहेत. ते गुजरातमधील हिमतनगर जिल्ह्यातील आहेत.

cropped-LOGO-4-Online.jpgखंबाळेंमधील किराणा दुकान मालक असलेल्या संजय पर्‍हाड यांच्या दुकानात सकाळी अकराच्या सुमारास या तिन्ही भोंदूबाबांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि तुमच्या मागे तुमच्या शत्रूंनी करणी केली असल्याने तुमचा व्यवसाय वाढत नसल्याचे त्यांना सांगितले. भोंदूबाबाच्या जाळ्यात फसल्यानंतर ही करणी काढण्यासाठी पूजा करावी लागणार असे या तिन्ही बाबांनी पर्‍हाड यांना सांगितले. त्यानंतर पूजेसाठी सामान म्हणून 2 हजारच्या 5 नोटा, 500 च्या 11 नोटा, 100 च्या 11 नोटा आणि 50 च्या 11 नोटा तसेच एक नारळ आणण्यास सांगितले. पर्‍हाड यांनी बाबांच्या मागणीनुसार त्यांना पूजेचे सामान आणून दिले. पूजा झाल्यावर या भोंदूबाबांनी लाल कपड्यात सोन्याची अंगठी बांधली आणि पर्‍हाड दाम्पत्याला बाहेर अगरबत्ती लावण्यास घराबाहेर जायला सांगितले. पर्‍हाड दाम्पत्य बाहेर गेल्याचा फायदा घेऊन या बाबांनी लाल कपड्यातील सोन्याची अंगठी काढून घेऊन पुन्हा तो लाल कपडा बांधून ठेवला. पर्‍हाड दाम्पत्य परत आल्यावर बाबांनी त्याला लाल कपडा उद्यापर्यंत उघडू नका, अशी ताकीद दिली. या पूजेसाठी या बाबांनी 4 हजार रुपये आणि संजय यांच्या पत्नीचा मोबाईल देखील घेतला.
दुसर्‍या दिवशी सकाळी संजय यांना या बाबांनी फोन करुन तुमची पूजा अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे पुन्हा पूजा करावी लागेल, असे सांगत या पूजेसाठी एका तरुणीचं काळीज लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संजय यांनी हे शक्य नसून तरुणीचे काळीज आणू शकत नाही, त्यामुळे ही पूजा करायची नाही, असे सांगितले. यावर तुम्हाला शक्य नसल्यास आम्ही तरुणीचं काळीज देतो. आम्हाला 5 लाख रुपये द्या, असा तगादा भोंदूबाबांनी पर्‍हाड यांच्यासमोर लावल्याने संजय यांना या बाबांवर संशय आला आणि त्यांनी सगळा प्रकार वाणगाव पोलिसांना सांगितला. त्यानंतर वाणगाव पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही बाबांना अटक केली.
आरोपींवर वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.