70 लाख 23 हजारांचा अपहार; गुन्हा दाखल

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : तालुक्यातील कोंढले ग्रामपंचायत हद्दीतील कॅपेसिटी स्ट्रक्चर्स (प्रतिभा) या कंपनीतील सुमारे 279 कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम सरकारी कार्यालयात न भरता परस्पर हडपल्याचा प्रकार उघडकीस आला असून 70 लाख 23 हजार रूपयांच्या या अपहाराप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांविरूध्द वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधी न भरणार्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील कोंढले ग्रामपंचायतीच्या हद्दीत कॅपेसिटी स्ट्रक्चर्स (प्रतिभा) ही कंपनी आहे. या कंपनीत 279 कामगार काम करीत आहेत. कंपनीने एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 अशा 17 महिन्यांच्या कालावधीत 70 लाख 23 हजार 108 रूपयांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम या कामगारांच्या वेतनातून कपात केली. मात्र ही रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटन या कार्यालयात भरलीच नाही. कामगारांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आपल्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा सरकारी कार्यालयात भरणाच झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयाच्या प्रवर्तन अधिकार्याच्या फिर्यादीवरुन कंपनीच्या संचालकांविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ अधिक तपास करीत आहेत.