शिरीष कोकीळ
डहाणू दि. ४: ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयोवृद्ध नागरिक नव्हे तर ज्ञानसमृद्ध नागरिक असतात. अशा वडीलधाऱ्या श्रेष्ठ नागरिकांशी भारतीय संविधान या विषयावर संवाद साधताना माझी उर्जा वाढेल आणि माझ्या ज्ञानात भरच पडेल असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना काढले. डहाणूच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजीत ‘ भारतीय संविधान व तिची बलस्थाने ‘ या विषयावरील कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोल
त होते. ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीला संविधानाची ओळख करुन दिल्यास उद्याच्या नागरिकाची जडणघडण होण्यास व देशाची सक्षम उभारणी होण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला.

१ ऑक्टोबर हा सर्वत्र ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. तथापी या दिवसाला लागून सलग सुट्ट्या येत असल्याने डहाणू तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्त ‘ भारतीय संविधान व तिची बलस्थाने ‘ या विषयावर जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष श्री रमेश शिर्के, श्री मारुती वाघमारे, श्री भारत वागासकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात जन्मदिन असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना गुलाबपुष्प देऊन व मिठाई भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.
पद्मश्री अनुताई वाघ यांची कर्मभूमी असलेल्या कोसबाडच्या टेकडीवरील विकासवाडी अध्यापक विद्यालयाला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्यासपीठावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.