जव्हार : अनैतिक संबंधातून 40 वर्षीय महिलेचा खून; आरोपी गजाआड

0
2615

जव्हार, दि. 13 : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील बाळांतीण डोंगराच्या परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या 40 वर्षीय महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 32 वर्षीय इसमाने अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले असुन आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ही कारवाई केली.

जव्हार तालुक्यातील पिंपळशेत-पळशीण येथील रहिवासी गुलाब शांताराम लाखन ही महिला 10 जुलै रोजी आपल्या घरापासुन काही अंतरावर असलेल्या शेतावर काम करण्यासाठी गेली होती. नेहमी संध्याकाळच्या सुमारास ती घरी परतत असताना 10 जुलैला मात्र परतलीच नाही. त्यामुळे कुटूंबीय व गावकर्‍यांनी तिचा आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर दुसर्‍या दिवशी, 11 जुलै रोजी सकाळी 10.30 च्या समुारास बाळांतीण डोंगराच्या परीसरात 150 मीटर अंतरावरील डोंगरउतारावार झाडा-झूडपांमध्ये तिचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. यानंतर जव्हार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला व याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.

तपासादरम्यान, सदर महिलेचे तिच्याच गावातील एका 32 वर्षीय इसमाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती बोईसर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी लागलीच सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असुन खूनामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.