पालघर, दि. 28 : जिल्ह्यातील तानसा-वैतरणा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करुन पर्यावरणाचा र्हास करणार्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत हजारो ब्रास रेतीसह 8 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन यात रेती उत्खननासाठी लागणारे शेकडो सक्शन पंप, जेसीबी व बोटींचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसी कारवाईची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी खार्डी व खानिवडे गावांच्या हद्दीत मोडणार्या नदी पात्रांवर ही कारवाई करण्यात आली. खार्डी हद्दीतील नदी किनारी सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव व नालासोपार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या पथकाने संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास छापा टाकून 71 लाख रुपये किंमतीची अंदाजे 750 ब्रास रेती, 1 कोटी 60 लाख रुपये किंमतीच्या 80 बोटी व 15 लाख रुपये किंमतीचा एक जेसीबी असा सुमारे 2 कोटी 99 लाख रुपयांचा मुद्देमाल, तर खानिवडे हद्दीतील नदी किनारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पालघरचे विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सातपाटी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत 83 लाख 97 हजार रुपये किंमतीची 850 ब्रास रेती, 1 कोटी 92 लाख रुपये किंमतीचे 102 सक्शन पंप, 3 कोटी 50 लाख रुपये किंमतीच्या अवैध रेती उत्खनन वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणार्या 150 बोटी, तसेच इतर ठिकाणी साठा करुन ठेवण्यात आलेली 4 लाख 93 हजार रुपये किंमतीची अंदाजे 50 ब्रास असा एकुण सुमारे 4 कोटी 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच सर्व आरोपी घटनास्थळावरुन फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्यावर विरार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 397 व 34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले अधिक तपास सुरु आहे.