mahanews.com वर दिनांक 15 जुलै रोजी ” लॉक डाऊन लाभार्थी : निविदा न उघडताच राई गावचा रस्ता तयार होऊन त्यावर कोंबडा आरवला “ ह्या शिर्षकाची बातमी प्रसारित झाली होती. डहाणू तालुक्यातील राई ग्रामपंचायतीतर्फे 9 जुलै रोजी एक रस्ता बनविण्यासाठी आवश्यक दगड, रेती, खडी, सिमेंट पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. निविदा 16 जुलै रोजी उघडण्यात येणार होती. मात्र त्या आधीच काम सुरु झाल्याने निविदा आधीच मॅनेज झाल्याची चर्चा झाली. हे वृत्त प्रसिद्ध होताच, डहाणूच्या गटविकास अधिकारी यांनी 16 जुलै रोजी ग्रामपंचायतीकडे खूलासा मागितला. गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने ग्रामपंचायतीने निविदा उघडली नाही. त्यानंतर मात्र फेरनिविदा न काढता पुन्हा तीच निविदा उघडून काम रेटून नेण्याचे प्रयत्न सुरु झाले असून आता 20 जुलै रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. गट विकास अधिकारी बाबाराव भराक्षे यांनीच, निविदा रद्द करण्याची आवश्यकता नसून पुन्हा उघडता येईल असे सांगितल्याचा दावा उपसरपंच नलिन पटेल यांनी राजतंत्रशी बोलताना केला आहे. असे असले तरी पंचायत समितीच्या अभियंत्याने पाहणी करावी व मगच कामाची फेर निविदा काढावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान झाई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच हेमंत पटेल यांनी डहाणूच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून नलिन पटेल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप केला आहे. नलिन पटेल हा स्वतःच कंत्राटदार असून गावातील घरकुले बांधणे व रस्ते बांधण्याचे काम स्वतःच करतो असाही आरोप तक्रारीत केला आहे.
रस्ता मी स्वतःच केला आहे. तो माझ्या वडिलांच्या घराकडे जाणारा असल्याने मी सुरु केला आहे. रस्त्याचे पैसे अजून काढलेले नाहीत. त्यामुळे मी कुठलाही भ्रष्ट्राचार केलेला नाही. फक्त 10 टक्के काम झालेले आहे. केलेल्या कामाचे पैसे मला नाही मिळाले तरी चालतील. निविदा काढून उरलेले काम सुरु करणार आहोत. ह्यापूर्वी देखील याच पद्धतीने कामे झाली आहेत.
नलिन पटेल, उपसरपंच (राई ग्रामपंचायत)
राजतंत्रमध्ये बातमी आल्यानंतर गटविकास अधिकारी साहेबांनी ह्याबाबत खुलासा मागितला. मला काम सुरु झाल्याची माहिती नव्हती. मी कामाला प्रत्यक्ष भेट दिली असता निविदा उघडण्यापूर्वी काम सुरु केल्याचे आढळले आहे. जवळपास 30 टक्के काम आधीच पूर्ण झाले आहे. त्याबाबतचा अहवाल गटविकास अधिकारी साहेबांना सादर केला आहे. त्यामुळे 16 जुलै रोजी निविदा उघडण्यात आली नाही. ग्रामपंचायतीने ही निविदा 20 जुलै रोजी उघडण्याचे ठरविले असले तरी बिडिओंच्या मार्गदर्शन व सूचना प्राप्त होतील. त्यास अधीन राहून पुढील कार्यवाही केली जाईल.
सौ. दीपा दवणे, ग्रामसेविका (राई ग्रामपंचायत)