दि. 11: डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतुल पिंपळे यांची वर्णी लागली असून पिंपळे यापूर्वी काही काळ डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. द्वासे यांना तूर्तास कुठलाही पदभार न देता अधांतरी ठेवले आहे. आज उशीरा पिंपळे हे पदभार स्वीकारतील असे समजते.
विजयकुमार द्वासे यांनी डहाणू नगरपरिषद पूर्णपणे डबघाईला आणली असून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे. नगरपरिषदेची इमारत भाड्याच्या जागेत असून हे भाडे लाच घेताना पकडले गेलेले तत्कालीन मुख्याधिकारी विनोद डवले व त्यानंतरचे विजय द्वासे यांनी कमिशनच्या लालसेपोटी 4 वर्षांपासून थकीत ठेवले आहे. आता थकीत 36 लाख रुपये देण्यासाठी नगरपरिषदेकडे पैसे नाहीत. शिवाय थकित भाड्यावरील व्याजाचा भुरदंड देखील सोसावा लागणार आहे.
द्वासे यांची चौकशी झाली तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊ शकेल, असा त्यांचा कारभार असल्याचे समोर येत आहे. अशा कारभाराचा एक नमुना पहा:-
सरावली येथे शंकर सुरती यांच्या घराजवळून 63 लाख रुपये खर्चून एक आरसीसी गटार बांधले जात आहे. या कामाला तांत्रिक मान्यता ऑगस्ट 2014 मध्ये मिळालेली आहे. 6 वर्ष इतक्या कालावधी नंतर ही तांत्रिक मान्यता संपुष्टात आलेली असते. तरीही तीच तांत्रिक मान्यता दाखवून, जिल्हाधिकारी कार्यालयाचे डोळे अर्थपूर्ण नजरेने बंद करुन त्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेतून निधी मिळवण्यात आला. निविदा मॅनेज करण्यात आल्या व प्रकाश कर्णावट या कंत्राटदाराला कर्णावट ट्रेडर्स या नावाने काम मिळाले. निवडणूक असो की कोरोना संकट असो, कुठेही काहीही पुरवठा करणाऱ्या किंवा वेळप्रसंगी काहीही पुरवठा न करता बिले देऊ शकणाऱ्या कर्णावट ने कॉन्क्रीट च्या ऐवजी मोठमोठे दगड भरुन हे गटार मार्गी लावले आहे. कॉन्क्रीट ऐवजी दगड भरण्याच्या प्रकाराबद्दल द्वासे यांच्याकडे सर्व पुरावे सादर केल्यानंतरही त्यांनी कोरोनाच्या Lock Down काळात काम बंद असल्याचे सांगून प्रत्यक्षात काम उरकून घेतले. प्रत्यक्ष नगराध्यक्षांच्या धाकल्या पातीचा, जगदीश राजपूत यांच्या प्रभागात द्वासे यांनी हा पराक्रम केला आहे.

हे देखील वाचा : ….. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे
डहाणूचा भाजीपाला ठप्प होण्याच्या मार्गावर

https://imjo.in/vq7QpV