आठ दिवसात गाठले सुमारे 1350 किलोमीटर अंतर

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 26 : तालुक्यातील धाकटी डहाणू येथील दोन तरुणांनी गोव्यातील मडगाव ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास सायकलवरुन पुर्ण करण्याची किमया केली आहे. आठ दिवसात या तरुणांनी तब्बल 1250 ते 1350 किमीपर्यंतचा हा पल्ला गाठला. गौरव किशोर तांडेल (वय 28) व प्रज्योत नरेश तामोरे (वय 26) अशी सदर तरुणांची नावे आहेत. तर गणेश भरत पागधरे (वय 28) या तरुणाची तब्येत खालावल्याने त्याला अर्ध्यातूनच हा प्रवास सोडावा लागला.

गौरव तांडेल, प्रज्योत तामोरे व गणेश पागधरे यांनी 13 डिसेंबर रोजी रेल्वेने मडगाव गाठले व पुढे सायकलवरुन कन्याकुमारी गाठण्याच्या त्यांच्या खर्या प्रवासाला 14 डिसेंबर रोजी मडगाव रेल्वे स्टेशनवरून सुरुवात झाली. यानंतर या तिघांनी गोवा, कर्नाटक, केरळ व शेवटी तामिळनाडू असे 4 राज्य केवळ 8 दिवसात पार केले. या प्रवासादरम्यान त्यांना बर्याच अडचणींना देखील सामोरे जावे लागले. एनआरसी व सीएए कायद्याविरोधात मंगलोर आणि केरळ येथे झालेल्या आंदोलनसारख्या परिस्थितींचा यात समावेश आहे. या सर्व अडचणी पार करुन मंगलोर गाठल्यानंतर आणखी एक वाईट परिस्थिती या तरुणांच्या वाटेला आली व त्यांच्यापैकी गणेश पागधरे या तरुणाची तब्येत खालावल्यामुळे त्याला प्रवास अर्ध्यात सोडून परतावे लागले. असे असताना गौरव आणि प्रज्योत यांनी माघारी न फिरत प्रवास चालू ठेवला आणि आपले ध्येय साकारले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.