ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला मोखाडा तालुका ग्रामसेवकांचा पाठिंबा!

0
2669

उद्यापासूनच आंदोलनात सहभागी होणार

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. ७ : राज्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत, याबाबत वारंवार बैठका घेऊन व पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने येत्या 9 ऑगस्ट रोजी असहकार आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी मोखाडा तालुका ग्रामसेवक संघटना एक दिवसापुर्वीच म्हणजेच उद्या, 8 ऑगस्टपासुनच असहकार आंदोलन करणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे मोखाडा तालुका अध्यक्ष किशोर सोनवणे यांनी सांगितले. तसेच आंदोलनानंतरही राज्य सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 22 ऑगस्टपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती युनियनचे पालघर जिल्हा सचिव विजय चोथे यांनी दिली.

राज्यातील जवळपास 22 हजार ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी युनियनने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र त्यायोगे केवळ तीनच प्रश्न सोडवून हजारो ग्रामसेवकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसण्याची बेमालूम मखलाशी केली आहे. ग्रामविकासातील महत्वाचा दुवा असलेला ग्रामसेवक हा त्याच्या यथोचित मागण्यांपासून आजही वंचित असुन न्याय्य मागण्यांतील अनेक प्रश्न कायम आहेत, असे सांगतानाच ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारीपद निर्माण करावे, ग्रामसेवकांना प्रवासभत्ता सरकारी निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक पात्रता बदलून पदवीधर ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात, 2005 नंतर नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना आगाऊ वेतनवाढ व एक गाव-एक ग्रामसेवक धोरण राबवावे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे चोथे यांनी सांगितले. तर राज्य ग्रामसेवक युनियनच्या या चळवळीला बळकटी देण्यासाठी मोखाडा तालुका ग्रामसेवक युनियन उद्या 8 ऑगस्टपासुनच या आंदोलनात सहभागी होत असल्याचे किशोर सोनवणे यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 9 ऑगस्ट रोजी राज्यभरात पंचायत समिती कार्यालयांसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील. 16 ऑगस्ट रोजी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेध आंदोलन, 20 ऑगस्ट रोजी मंत्री, राज्यमंत्री, प्रधान सचिवांच्या निवासस्थानांसमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येईल. 21 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने देण्यात येतील. यानंतर मात्र 22 ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन केले जाणार असुन या टप्प्यांनुसार आंदोलनाची दिशा असल्याचे चोथे यांनी सांगितले आहे.