वैदेही वाढाण
बोईसर, दि. 21 : जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी येथील एका रिक्षा चालकावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीम शेख असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नदीम हा तारापूरचा रहिवासी असून तो बोईसर तारापूर दरम्यान ६ आसनी मिनीडोअर चालवतो. काल त्याच्या रिक्षात बसलेले प्रवासी पुलवामा (काश्मिर) येथे सीआरपीएफ च्या जवानांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याविषयी चर्चा करत होते. नदीमने आगंतुकपणे या चर्चेत भाग घेऊन भारतीय जवानांविषयी आक्षेपार्ह विधान केले. एका प्रवाशाने त्याची व्हिडीओ क्लिप बनवली व सोशल मिडीयावर व्हायरल केली.
एकीकडे शहीद जवानांविषयी ठिकठिकाणी आदरांजली वहात असताना नदीमच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे लोक संतप्त झाले. बोईसर, तारापूर, चिंचणी, पाचमार्ग, घिवली, कुडण, दांडी येथील लोक रस्त्यावर उतरले व नदीमच्या अटकेची मागणी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीसांचे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. अखेर रात्रीच पोलीसांनी नदीमवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्यानंतर प्रकरण निवळले आहे. लोकांनी शांतता बाळगावी व जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी केले आहे.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!