पालघर, दि. 29 : गाव-खेड्यांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील 10 गावांमध्ये कियोस्क यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी पालघर जिल्हा परिषद, प्रथम इन्फोटेक, एल अँड टी पब्लिक चेरीटेबल ट्रस्ट आणि एस.आय.पी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज, सामंजस्य करार करण्यात आला.
या कार्यक्रमांतर्गत झरी, कोचाई, गिरगाव, उपलाट, सुत्रकार, उधवा, वेवजी, डोंगारी, वसा आणि झाई-बोरीगाव या गावांमध्ये कियोस्क यंत्र बसविण्यात येणार आहेत. या गावातील लोकांना कियोस्क यंत्राच्या मदतीने शासनाच्या आपले सरकार या संकेतस्थळावरुन डिजीटल सातबारा, आर्थिक व्यवहार, आधार नोंदणीबाबत माहिती आणि शासकीय योजनांची माहिती सोयीस्करपणे उपलब्ध होणार आहे. यासाठी स्थानिक युवक आणि युवतींना व प्राधान्याने महिला आणि युवतींना प्रशिक्षन देऊन या केंद्रात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच गाव-खेड्यांमध्ये डिजिटल साक्षरता निर्माण करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली आहे.