संजीव जोशी / संपादक – दैनिक राजतंत्र
वैयक्तिक संपर्क : 9822283444mahanews Media: 9890359090
[email protected]
mahanews Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखालील पालघर जिल्हा पोलिसांनी कोरोना विषाणूंपासून पोलिसांचा बचाव करण्यासाठी अनेक पोलिस स्टेशनमध्ये सॅनिटायझर चॅनल सुरु केले आहेत. एक पिंप, एक इलेक्ट्रिक स्प्रे पंप, आणि एक खोके अशा पद्धतीने जुगाड करुन हे स्थानिक लोकांच्या सहभागातून हे चॅनल बनवले आहेत. पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या चॅनलमधून आत जाऊन, स्वतःवर फवारणी करुन घ्यायची. पोलिस स्टेशनला जाणाऱ्या सर्वच नागरिकांनी या चॅनलमधून स्वतःवर फवारणी करूनच जायचे. म्हणजे ते कोरोना मुक्त होतील आणि त्यांच्यापासून पोलिसांना कोरोनाची लागण होणार नाही. स्वतः पोलिस अधिक्षकांनीच अशा चॅनलचे उद्घाटन करुन, स्वतःवर फवारणी करुन घेतल्यावर कोण पोलिस स्वतःवर फवारणी करुन घेणार नाही? त्यातही पुन्हा प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये ही यंत्रणा उभारण्याचे घोषित केले. किती काळजी असते एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला, आपल्या कर्मचाऱ्यांची!
मला हे जुगाड सॅनिटायझर चॅनल पाहिल्यानंतर, अभिमान वाटला पालघर जिल्ह्याचा. कोरोना विषाणूच्या लढाईत पालघर जिल्हा संपूर्ण जगात भाव खाऊन जाईल असे वाटले. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास, लॉक डाऊनची गरज उरणार नव्हती. रेल्वे, मॉल, थियेटर सर्व सुरु करता आली असती. फक्त गेटवर फवारणी करायची आणि मग रेल्वे स्टेशनमध्ये, मॉल मध्ये किंवा थियेटर मध्ये प्रवेश द्यायचा. हॉस्पिटलच्या बाहेर, गेटवर फवारणी करायची. सर्व डॉक्टर, नर्सेस आणि येणारे जाणारे, निर्जंतुक झाल्यावर कोरोनाला आळा बसेल. विचार आला राज्यात, देशात हा प्रयोग का करीत नसावेत? अधिक तपशील जाणून घेण्यासाठी मी पोलिस अधिक्षक गौरव सिंग, पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी, संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना विचारणा केली, फवारणीमध्ये काय वापरतात? माझ्या मनात प्रश्न आले, अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर असेल तर ते ज्वलनशिल असल्याने फवारणी धोकादायक ठरेल. जंतुनाशक असेल तर, मानवी आरोग्याला हानिकारक ठरेल. म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनाही विचारणा केली. वाटले आरोग्य विभागाने शिफारस केली असेल. त्यांनीही उत्तर दिले नाही. अनेक डॉक्टर मित्रमैत्रिणींशी बोललो. त्यांनी कपाळावर हात मारले. आरोग्य मंत्रालयाला देखील हे जुगाड मॉडेल पाठवून दिले आणि कळवले, बघा तुम्हाला काही उपयोग होतो का ते. मग पुन्हा एकदा गौरव सिंग स्वतः डॉक्टर वगैरे आहेत का, ते तपासले. पण तशी काही माहिती हाती लागली नाही. गौरव सिंग यांनी एका व्हॅनमध्ये देखील हा जुगाड केला. मनस्त कल्पना आली, सरळ प्रत्येक पोलिसाच्या हातात सलून मध्ये असतात तसे स्प्रे दिले तर? हवे तेव्हा फवारणी करुन घेता येईल. त्यासाठी व्हॅन कशाला वाया घालवायची? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे एका सरकारी कागदाने दिली आहेत.
पालघरचे पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांची सॅनिटायजर व्हॅन विषयी माहिती
आता भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने, 18 एप्रिल रोजी एक ॲडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे. या ॲडव्हायझरी मध्ये अशा पद्धतीची फवारणी चुकीची ठरवली आहे. कुठल्याही परिस्थितीत, अशी फवारणी व्यक्तीवर किंवा समुहावर करु नये. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखता येत नाही. उलट अशा फवारणीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो असे या ॲडव्हायजरीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातून पालघर पोलिसांचे जुगाड सॅनिटायझरचे प्रयोग बेजबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट अशा प्रयोगांवर विश्वास ठेवून लोक सोशल डिस्टन्सींग आणि हात धुण्याकडे कमी गांभीर्याने पाहण्याचा धोका आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचा तरी सल्ला गौरव सिंग यांनी घ्यायला हवा होता. असा सल्ला घेतला नसेल तरी, डॉक्टर असलेल्या जिल्हाधिकारी यांनी तो स्वतःहून दिला पाहिजे होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अवैज्ञानिक तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर न तपासता कुठल्याही गोष्टी करु नयेत. अशी कृत्ये अफवा पसरण्याची निमित्त ठरतात. दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांनी सॅनिटायजर चॅनल बनवले आणि वृत्तवाहिन्यांनी कौतुक केले म्हणजे त्याचे पालघर पोलिसांनी अनुकरण केलेच पाहिजे असे नाही. कारण अशा सॅनिटायजर चॅनलने कोरोना विषाणूंना आळा घालता येईल, ही माहिती एक प्रकारे अफवाच होती. सोशल मिडियावरील क दर्जाच्या फॉरवर्ड मॅसेज प्रमाणे. पोलिसांनी खातरजमा केल्याशिवाय हा प्रयोग नक्कीच केला नाही पाहिजे. सामान्य माणसाने असे प्रयोग केले असते तर कदाचित त्याच्यावर भारतीय दंड संहितेचे सध्या प्रसिद्धीस पावलेल्या कलम 188 प्रमाणे गुन्हा देखील दाखल झाला असता.