बोईसर, दि. 14 : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत छुप्या पद्धतीने ग्राहकांना सोने विक्री करणार्या नामांकित वामन हरी पेठे ज्वेलर्सवर पोलिसांनी कारवाई करत दुकानातील कर्मचारी व महिला ग्राहक अशा 8 ते 10 जणांना ताब्यात घेतले आहे. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असुन पोलिसांच्या पुढील कारवाईचा तपशिल मिळू शकलेला नाही.
बोईसरमधील भीमनगर भागातील मुख्य रस्त्याला लागूनच वामन हरी पेठे हे नामांकित सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. आज दुपारी 12.30 च्या दरम्यान छुप्या पद्धतीने हे दुकान सुरु असल्याचे समजल्यानंतर बोईसर पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. यावेळी शटर बंद करुन ग्राहकांना सोने चांदी विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दुकानातील कर्मचारी व महिला ग्राहक अशा 8 ते 10 जणांना ताब्यात घेतले असुन त्यांच्यावरील तसेच दुकानाच्या मालकावरील पुढील कारवाईबाबतचा तपशिल अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही.