मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिमाखदार संयोजन

0
2903
दिपप्रज्वलन व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली

डहाणू, दि. 7 : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे दिमाखदार वातावरणात पार पडला. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले व प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ माध्यम तज्ञ समिरण वाळवेकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार राजेश पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अखिल भारतीय अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हा सरचिटणीस वैभव पालवे, संयोजन समिती अध्यक्ष निरज राऊत, सल्लागार अच्युत पाटील व पी. एम. पाटील, उपाध्यक्ष हेमेंद्र पाटील उपस्थित होते.

नाना पटोले यांना ग्रंथभेट देताना संजीव जोशी

रविवार, 7 फेब्रुवारी रोजी बोर्डी येथील सु.पे.ह. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाच्या पूज्य चित्रे गुरुजी विश्रामधाम येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पुरस्कार्थी संघांचे जवळपास 200 पत्रकार शनिवार, 6 फेब्रुवारी रोजी मुक्कामी आले होते. रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा संघाला देण्यात आला. वसंतराव काणे आदर्श तालुका संघांसाठी राज्यातील 8 महसूल विभागांतून प्रत्येकी 1 याप्रमाणे अक्कलकोट तालुका मराठी पत्रकार संघ, निपाणी तालुका मराठी पत्रकार संघ, रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार संघ, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ, दारव्हा तालुका मराठी पत्रकार संघ, सावली तालुका मराठी पत्रकार संघ, गेवराई तालुका मराठी पत्रकार संघ व चाकूर तालुका मराठी पत्रकार संघ या पत्रकार संघाना गौरविण्यात आले. विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंदार पारकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना एस. एम. देशमुख.
  • पालघर जिल्ह्यातर्फे परिषदेला 1 लाख 1 हजारांची थैली!
    परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले परिषदेचे कार्य अधिक जोमाने सुरु रहावे याकरिता पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने नाना पटोले यांच्या हस्ते एस. एम. देशमुख यांच्या हाती 1 लाख 1 रुपयांची थैली सोपवली.
  • नाना पटोलेंचे गडचिरोलीचे आमंत्रण!
    लोकशाहीमध्ये लेखणीची ताकद व पत्रकारांची ताकद कमी करणे हा खर्‍या अर्थाने देशद्रोह आहे असे विचार मांडून नाना पटोले यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे देशाचा चौथा आधारस्तंभ मजबूत ठेवण्याकरिता चालू असलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. महाराष्ट्राच्या एका टोकापासूनचे पत्रकार बोर्डीसारख्या दुसर्‍या टोकाला आलेले पाहून नाना पटोले यांनी पुढील कार्यक्रम गडचिरोली येथे घ्यावा, असे निमंत्रण परिषदेला दिले. नाना पटोलेंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व मोखाड्याच्या सभापती सारिका निकम, डहाणूचे माजी नगरसेवक संतोष मोरे यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास विशेष हजेरी लावली.
समिरण वाळवेकर यांचे स्वागत करताना संयोजन समिती अध्यक्ष निरज राऊत

मुख्य वक्ते, माध्यम तज्ञ समिरण वाळवेकर यांनी सद्यस्थितीत वृत्तपत्र मालकांकडून पत्रकारांना बातम्यांपेक्षा जाहिराती गोळा करण्याचे काम अधिक करावे लागते याविषयी परखड शब्दांत वस्तुस्थिती समोर आणली. बदलत्या काळात स्थानिक वृत्तपत्रात येणार्‍या बातम्या अधिकच महत्त्वाच्या असल्याचे मत त्यांनी मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून एस. एम. देशमुख यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली व पुरस्कार देण्यामागची भूमिका उलगडून सांगितली. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने अतिशय सुनियोजित व सूक्ष्म व्यवस्थापन करुन कार्यक्रमाचे संयोजन केल्याबद्दल जिल्ह्यातील पत्रकारांचे कौतुक केले.

  • ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
    कार्यक्रमात वयाची साठी ओलांडलेले ज्येष्ठ पत्रकार निरंजन राऊत, पी. एम. पाटील, अच्युत पाटील, डॉ. हेमंत जोशी यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
  • मान्यवरांना ग्रंथभेट
    कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांना यावेळी पद्मश्री अनुताई वाघ यांचे कोसबाडच्या टेकडीवरुन व गोदावरीताई परुळेकर यांचे जेव्हा माणसाला जाग येते ही पुस्तके भेट दिली. या दोन्ही मान्यवरांच्या कार्याची माहिती व्हावी या हेतूने ही ग्रंथभेट देण्यात आली.
खासदार गावीत यांना स्मृतीचिन्ह देताना परिषदेचे जिल्हाध्यक्ष हर्षद पाटील

परिषदेचे अखिल भारतीय सरचिटणीस, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची व पालघर जिल्ह्यातून राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांची उपस्थितांना माहिती करुन दिली. जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. जतीन व प्रतिभा कदम या दांपत्याने सुत्रसंचालन केले. बोर्डी ग्रामपंचायतीतर्फे उप सरपंच दिनेश ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.