आयपीएलवर सट्टा : डहाणूतील एका व्यापार्‍यासह तिघांवर गुन्हे

अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबई-राजस्थान मॅचवर लावला होता 60 हजारांचा सट्टा

0
4645

डहाणू, दि. 7 : आयपीएल (इंडियन प्रिमियर लिग) च्या काल, मंगळवारी पार पडलेल्या मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या क्रिकेट सामन्यावर 60 हजार रुपयांचा सट्टा लावणार्‍या डहाणूतील एका व्यापार्‍यासह तीन जणांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. जिनेश पुनामिया असे सदर व्यापार्‍याचे नाव आहे.

सध्या दुबई येथे सुरु असलेल्या आयपीएलच्या विविध क्रिकेट सामन्यांवर डहाणू येथे मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात असून डहाणू काटीरोडवरील साईराज मेडीकल या दुकानातील व्यापारी जिनेश पुनामिया (वय 34 वर्षे रा.घोलवड) हा सामन्यांवर सट्टा लावत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या पथकाने काल, 6 ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये सुरु असलेल्या सामन्यादरम्यान जिनेश पुनामियाच्या हालचालींवर लक्ष ठेवले. संशयास्पद वाटल्याने पहिली ईनिंग संपल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासल्यानंतर त्याने आपला साथिदार इरफान शेखकडून नामक अ‍ॅप घेतल्याचे व या अ‍ॅपद्वारे मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स या सामन्यावर 60 हजार रुपयांचा सट्टा लावल्याचे समोर आले. सदर अ‍ॅपच्या आयडी व पासवर्डसाठी पुनामियाने त्याला एक लाख रुपये दिल्याचेही त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

  • तिघांवर गुन्हे दाखल
    प्रथमदर्शनी पुनामियाने सट्टा लावल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यासह इरफान शेख व त्याचा सहकारी शाहबाज अशा तीन जणांविरुद्ध डहाणू पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.