वार्ताहर
बोईसर, दि. 26 : तारापूर एमआयडीसीलगतच्या अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला कुंभवली परिसरातील इपका फार्मासिटीकल कारखान्याजवळ गळती लागल्याने या जलवाहिनीत रासायनिक सांडपाणी मिश्रीत होऊन आजूबाजूच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सालवड, पास्थळ, पाम, टेंभी, नवापुर, नांदगाव, आलेवाडी, कोलवडे, कुंभवली आदी एमआयडीसीलगत असलेल्या गावांना एमआयडीसीतर्फेच पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या गावांना जलपुरवठा करणार्या सर्वच जलवाहिन्या एमआयडीसीतील कारखान्यांजवळूनच जातात. येथील अनेक कारखानदार निष्काळजीपणे प्रक्रिया न केलेले सांडपाणी सार्वजनिक नाल्यात सोडत असल्याने जलवाहिन्या गेलेल्या अनेक ठिकाणी या रासायनिक सांडपाण्याची डबकी साठली आहेत. अशात इपका फार्मासिटीकल कारखान्यासमोरुन जाणार्या एका जलवाहिनीला गळती लागल्याने येथे रासायनिक सांडपाणी मिश्रीत पाण्याचे डबके तयार झाले आहे. त्यामुळे या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार्या अनेक गावांतील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गावांमधील नळांना लाल रंगाचे पाणी येत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. मात्र येथील विहिरी व बोअरवेलला येणारे पाणीदेखील प्रदुषित असल्याने नागरीकांना एमआयडीसीच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत असून नागरीक विना तक्रार या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत आहेत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता एमआयडीसी परिसरातील गळती लागलेल्या जलवाहिन्यांची त्वरीत दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वीच एमआयडीसी परिसरातील रोनक ढाब्यासमोरील जलवाहिनीला गळती लागल्याने परप्रांतीय लोक येथे अंघोळ-धुणीभांडी करत असल्याचे व त्यामुळे येथे जमा झालेले सांडपाणी जलवाहिनीत मिश्रीत होऊन परिसरातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.