दि. 23 मार्च: पालघरच्या गतपूर्व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनी त्यांच्या कार्यकाळात नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट मधील तरतुदींकडे दुर्लक्ष करुन खासगी सुश्रुषागृहांना 3 वर्षांऐवजी 5 वर्षांसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी 5 वर्षांसाठी दिलेली नोंदणी रद्द करुन नव्याने 3 वर्ष मुदतीची नोंदणी प्रमाणपत्रे दिली आहेत. नियमभंग झालेला असला तरी ह्या प्रकाराची कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्याच्या शहरी भागातील 45 खासगी रुग्णालये जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखाली येतात. दर 3 वर्षांनी नोंदणी करण्याची प्रक्रिया राबवताना बऱ्याचदा डॉक्टर मंडळींना वेठीस धरले जाते. त्यांची अडवणूक करुन दलालांमार्फत पैसे उकळले जात असल्याचा आरोप होत असतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी डहाणूतील 12 सुश्रुषागृहांना तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनी 5 वर्षांसाठी नोंदणी प्रमाणपत्रे दिली होती. त्यासाठी 5 वर्षांच्या हिशेबाने व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान वाणेरे यांची बदली झाली व नवे शल्य चिकित्सक डॉ. थोरात रुजू झाले. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ संपेपर्यंत ही नोंदणी प्रकरणे त्यांच्या समोर आलीच नसती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर, डॉ. थोरात यांनी सर्व नोंदणी प्रमाणपत्रे परत मागवून घेतली व नव्याने 3 वर्षे मुदतीची प्रमाणपत्रे अदा केली. आता अशा सुश्रुषागृहांना 3 वर्षांची मुदत संपल्यानंतर पुन्हा नव्याने नोंदणी करुन घ्यावी लागणार आहे.
याबाबत डॉ. थोरात यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी 5 वर्षांची नोंदणी नियमबाह्य असल्याने रद्द केल्याचे मान्य केले. मात्र नियमबाह्य नोंदणी प्रमाणपत्रे अदा केल्याबद्दल अजून कोणावरही जबाबदारी निश्चित केली नसल्याचे सांगितले.