पालघर दि. 25 : प्लाझ्मा दान करणे ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे, जी 100 वर्षाहुन अधिक वर्षांपासुन रुग्णांचे जीव वाचविण्यात मदत करण्यासाठी वापरली जात आहे. प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोविड 19 चा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी कोविड 19 बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्या जास्तीत जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येवून कोविड 19 च्या रुग्णांना जिवनदान देण्याचे मोठे काम करावे, असे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी. गंगाधरण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला केले आहे.
कोरोना रोगापासून पुर्णपणे बरा झालेल्या कोरोना योध्यांनी कोरोना झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याची तातडीची गरज आहे. कारण आपली रोगप्रतिकारक प्रणाली कोरोना विरुध्द लढली, त्यामुळे आपल्यामध्ये अँटीबॉडीज आहेत जे इतरांनाही लढायला मदत करतील, असे मत जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी व्यक्त केले आहे.
- प्लाझ्मा थेरपी प्रक्रिया :-
कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा हा रक्ताचा एक द्रव भाग आहे, जो कोविड-19 रोगापासून पूर्णपणे मुक्त झालेल्या रुग्णांकडून गोळा केला जातो. कोविड-19 रुग्णांमध्ये विषाणूविरुध्द रक्तामध्ये रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉडीज) तयार होतात. अॅन्टीबॉडी असे प्रोटीन आहेत जे संक्रमणास विरोध करण्यासाठी मदत करतात. कोरोनाची लागण होऊन 28 दिवस पूर्ण झालेल्या 18 ते 60 वयोगटातील व 55 किलोग्रॅमच्या वर वजन असलेल्या तसेच इतर रक्तदान निकषांची पूर्तता केली असावी, असे पुरुष प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरतात. प्लाझ्मा डोनेशन दरम्यान एका हातातुन रक्त काढले जाते. यानंतर हायटेक मशिनद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा संकलित केला जातो. या प्रक्रियेमुळे नियमित रक्तदानापेक्षा जास्त वेळ प्लाझ्मा दान घेते (60 ते 90 मिनिटे). पात्र प्लाझ्मा दाता प्रत्येक 14 दिवसांनी कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा देवू शकतो, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभामार्फत देण्यात आली आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी विजय महाजन चेअरमन साथीया ट्रस्ट ब्लड बँक दूसरा मजला, तानीया प्लाझा बिल्डींग, स्नेहांजली शोरुमच्या मागे, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पश्चिम) फोन नंबर 9028641886 यांच्याशी सम्पर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
