जिल्हाधिकार्यांच्या संबंधितांना सुचना
पालघर, दि. 26 : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यांमधून बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाच्या मदतीने बोईसर व परिसरामध्ये 200 बेडचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर निर्माण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधितांना केली आहे. त्याचबरोबर पालघरमधील कांबळगाव येथील कोव्हिड केअर सेंटरचे मजबुतीकरण करणे व टिमा रुग्णालयातील संपूर्ण 40 बेड आयसीयूत रुपांतरीत करण्यात यावे, अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

या विषयास अनुसरून जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी काल, 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत प्रांताधिकारी, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य वसई, बोईसरचे कामगार उपायुक्त, उप अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बोईसर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-1 व 2 तसेच विराज प्रोफाइल प्रा. लि., टाटा स्टील प्रा. लि., जेएसडब्ल्यू प्रा.लि., लुपिन लिमिटेड, निऑन फाउंडेशन (पालघर), आरती ड्रग्स कंपनी व तारापूर औद्योगिक व्यवस्थापन असोसिएशन (टिमा) चे अध्यक्ष आदी सहभागी झाले होते.
वर नमुद सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक व्यवस्थापनाकडे असणार्या अॅम्बुलन्स कोव्हिड रुग्णांच्या सेवेसाठी बोईसर येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.