पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

0
2527

18 जागांसह ठरला सर्वात मोठा पक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचीही 14 जागांवर मजल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : मंगळवारी (दि. 7) पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेना 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर मजल मारली आहे. 2015 साली झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकणार्‍या भाजपला या निवडणुकीत 12 जागांसह तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 29 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र कुठल्याही पक्षाला हा आकडा पार करण्याइतके संख्याबळ मिळालेले नाही.

पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या 8 पंचायत समित्यांसाठी काल, मंगळवारी मतदान पार पडले. यावेळी 63 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आज, बुधवारी सकाळी मतमाजेणीला सुरुवात झाली व दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आल्यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. गेल्या निवडणुकीत 14 जागा जिंकणार्‍या शिवसेनेने यंदा 4 जागा जास्त जिंकत 18 जागा जिंकल्या आहेत. तर अवघ्या 4 जागा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात यावेळी 14 जागा आल्या आहेत. मागील निवडणुकीत 5 जागा जिंकलेल्या माकपनेही यावेळी एक पाऊल पुढे टाकत 6 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला पुन्हा 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. याशिवाय 2 जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

भाजप ब बविआला फटका
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या भाजपला जिल्हा परिषदेतही स्थानिक मतदारांनी नाकारले आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत 21 जागा जिंकलेल्या भाजपला यावेळी 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर बहूजन विकास आघाडीच्याही 6 जागा कमी झाल्या असुन केवळ 4 जागा राखता आल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला 29 जागांचा बहूमताचा आकडा न गाठता आल्याने विधानसभेप्रमाणे पालघर जिल्हा परिषदेतही शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.