डॉ. रमेश गायकवाड यांचे अपील मंजूर विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

0
3748

_facebook_1528717727772राजतंत्र न्यूज नेटवर्क
             डहाणू दि. ११: येथील प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ञ डॉ. रमेश गायकवाड यांना पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने विनयभंगाच्या आरोपांतून मुक्त केले आहे. याप्रकरणी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून १ महिन्याची साधी कैद आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे डॉ. गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या वतीने पालघर येथील नामांकित विधीज्ञ ॲडव्होकेट सुधीर गुप्ता यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
१० वर्षांपूर्वी डॉ. गायकवाड यांच्यावर एका महिलेने तपासणीच्यावेळी विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार फिर्यादीने डहाणू पोलीस स्टेशनला केली. डहाणू पोलीसांनी डॉ. गायकवाड यांच्या विरोधात आरोपपत्र सादर केले आणि जवळपास ८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होऊन डॉ. गायकवाड यांना दोषी ठरविण्यात आले. त्यावर डॉ. गायकवाड यांनी पालघर येथील सत्र न्यायालयात अपील केले होते.
पालघरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांच्यासमोर अपील सुनावणीसाठी आले असता त्यांनी फिर्यादी स्वतः शासकीय प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये नर्स असणे, तीचा पती शासकीय सेवेतील डॉक्टर असणे, फिर्यादीचा भाऊ डहाणू पोलीस स्टेशनमध्ये नेमणूकीस असणे आणि फिर्याद देण्यास विलंब होणे हे मुद्दे विचारात घेतले. तसेच डहाणू येथील उप जिल्हा रुग्णालयात कान-नाक-घसा तपासणीची सुविधा उपलब्ध असताना, शिवाय शासकीय सेवेतील नर्सला ही सेवा विनाशुल्क उपलब्ध असताना ती खासगी रुग्णालयात का आली असावी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. पोलीसांनी डॉ. गायकवाड यांनी फिर्यादीला दिलेले मेडिकल प्रिस्क्रीप्शन पुरावा म्हणून सादर केले होते. हा पुरावा फिर्यादीवर उलटला आहे. तपासणी करताना विनयभंग झाला असेल तर एखादी महिला त्यानंतर विनयभंग करणाऱ्या डॉक्टरकडून औषधे लिहून घेण्यासाठी थांबेल का? असा प्रश्न उपस्थित करुन फिर्याद विश्वासार्ह नसल्याचा महत्वाचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यातून संशय निर्माण होत असल्याने डॉ. गायकवाड यांचे अपील मंजूर करुन त्यांना खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा रद्द केली आहे.

 

मनाला वेदना देणाऱ्या या प्रकरणात मला उशीरा का होईना
न्याय मिळाला आहे. माझ्या सत्वपरिक्षेच्या काळात मला साथ
देणाऱ्या, माझे मनोधैर्य वाढवून मला बळ देणाऱ्या आणि माझ्यावर
विश्वास ठेवणाऱ्या तमाम हितचिंतकांचा मी ऋणी आहे.
                                                                डॉ.  रमेश गायकवाड